SR 24 NEWS

जनरल

तर अख्ख्या महाराष्ट्रातील भाऊबंदकी नष्ट होईल –  डॉ. श्रीपाल सबनीस,   डॉ. बाळासाहेब बांडे यांच्यावरील संघर्षयात्री ग्रंथाचे प्रकाशन 

Spread the love

विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण  (पारनेर)  : महाराष्ट्रात अनादी काळापासून भाऊबंदकी सुुरू आहे. ती शिवाजी महाराजांच्या काळात अन पेशवाईमध्येही सुरुच होती. पण आज एका चुलत भावाने आपल्या भावावर इतके छान पुस्तक लिहीले आहे. ही साधी गोष्ट नाही. प्रत्येक कुटुंबात असे भाऊ जन्माला आले तर महाराष्ट्रातील अख्खी भाऊबंदकी नष्ट होईल, असा विश्वास अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ लेखक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केला. 

नाेबेल पुणे हाॅस्पिटलचे मुख्य कन्स्टलंट व आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब बांडे यांच्या जीवनावर स्व. बाबासाहेब बांडे यांनी लिहीलेल्या ‘संघर्षयात्री डाॅ. बाळासाहेब बांडे’ या ग्रंथाच्या पहिल्या भागाचे प्रकाशन आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे, हभप डॉ. नारायण महाराज जाधव, डॉ.श्रीपाल सबनीस, पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते व जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे ज्येष्ठ विश्वस्त सिताराम खिलारी यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी, खासदार निलेश लंके, आमदार काशिनाथ दाते, साहित्यविश्व प्रकाशनचे संस्थापक विक्रम शिंदे, मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजीव सोनवणे आदी उपस्थित होते. 

तर लाचार पिढया तयार होतील

डाॅ. सबनीस पुढे म्हणाले, डॉ. बांडे यांनी जो संघर्ष अनुभवला व भाेगला तो त्यांच्या एकट्याचा नाही. कारण भांडवली व्यवस्थेत तुमचे केवळ आिर्थकच नव्हे तर सामाजिक अन सांस्कृतिक व शैक्षणिक शोषणही होत असते. म्हणून हा संघर्ष प्रातिनिधीक वाटतो. व या विषमतेतूनच डॉ. बांडे यांच्यासारखे संघर्षशील व्यक्तिमत्व घडत असते. शिक्षक बिघडला तर विद्यार्थी पण बिघडत असतो. पुढाऱ्यांच्या बॅगा उचलणारे शिक्षक असतील तर लाचार पिढीच तयार होत असते. 

 प्रेरणा कृतीतून दिसली पाहिजे 

अण्णा हजारे म्हणाले, जो संघर्ष करतो तोच चांगला मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरू शकतो. तुमची प्रेरणा ही कृतीतून दिसत असते, बोलण्यातून नव्हे. डॉ. बांडे यांच्या आरोग्य व सामाजिक कामाची कृती खूप उंचीची आहे म्हणून त्यांचे काम आज समाजाला प्रेरणादायी ठरत आहे. केवळ पारनेरचाच नव्हे तर कुठलाही रूग्ण त्यांच्याकडे गेल्यास त्याला मार्गदर्शन व उपचार चांगले भेटणार हा रुग्णाला व त्यांच्या नातेवाईकांना विश्वास असतो हे डॉ. बांडे यांचे खरे यशाचे गमक आहे. 

 पद्मश्री मिरवण्यासाठी नाही 

पद्मश्री ही जनतेसाठी आहे. ती मिरवण्यासाठी नाही. जिल्ह्यात मी प्रोटोकॉल कधीच पाळला नाही. लोकांसाठी काम करत राहिलो. डॉ. बांडेही रुग्ण कुठला हे ते बघत नाही . आरोग्य क्षेत्रात त्यांचे मोठे काम आहे. गावातही सामािजक काम केले पाहिजे त्यातून आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठानचा जन्म झाला. संघर्षयात्री प्रवास महत्त्वाचा आहे. पुस्तक प्रेरणा देत असतात. हातात आलेला मोबाईल आज घातक ठरत असून कुटुंब उध्वस्त होत आहेत. गुटखा खाणारी पिढी निर्माण होत आहे. पर्यावरण संवर्धन झाले नाही तर पुढच्या २५ वर्षात मानवी अस्तित्व धोक्यात येणार आहे, अशी भिती पोपटराव पवार यांनी व्यक्त केली. 

 

कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती 

यावेळी खासदार लंके, आमदार दाते, विजय औटी, डॉ. जाधव महाराज, सिताराम खिलारी, जी.डी. रोहाेकले, सविता बांडे, डॉ. बाळासाहेब बांडे यांनीही मनोगते व्यक्त केली. प्रास्तविक बापूसाहेब बांडे, तर सूत्रसंचालन प्रा. विजय लोंढे यांनी केले. रामदास पुजारी यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. सरोज बांडे, दत्तात्रय बांडे, सविता बांडे, मंदा हांडे, सखाराम औटी, रावसाहेब रोहोकले, गिताराम म्हस्के, डॉ. अक्षयदीप झावरे, रावसाहेब झावरे, बाळासाहेब खिलारी, महेश ढूस, डॉ. भाऊसाहेब खिलारी आदी मान्यवर उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!