SR 24 NEWS

जनरल

राहुरीत उद्यापासून हेल्मेटची सक्ती प्राणांतिक अपघात रोखण्यासाठी मोहिम हेल्मेट न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा पोलिसांचा इशारा

Spread the love

राहुरी प्रतिनिधी : प्राणांतिक अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता मा. अपर पोलीस महासंचालक श्री. कृष्ण प्रकाश साहेब यांच्या सूचनेनुसार आणि मा. पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री. सोमनाथ घारगे साहेब यांच्या निर्देशानुसार दिनांक १० फेब्रुवारी २०२६ पासून राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर नियमित व कडक कारवाई करण्यात येणार आहे.

राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत सन २०२४ मध्ये ५७ तर सन २०२५ मध्ये ५८ प्राणांतिक अपघात घडले असून, तेवढ्याच निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातांमध्ये बहुतांश मृत्यू हे दुचाकी चालवताना हेल्मेट न वापरल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नगर–मनमाड महामार्गासह परिसरात दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करून स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, अहिल्यानगर ते मनमाड महामार्गाचे काम सुरू असल्याने राहुरी शहरात एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली आहे. मात्र, काही वाहनचालक गर्दीचा फायदा घेत रॉंग साईडने वाहने चालवून वाहतूक कोंडी निर्माण करीत असल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी रॉंग साईडने वाहन चालवणाऱ्या ४० वाहनधारकांवर कारवाई करून एकूण ३०,००० रुपये दंड वसूल करण्यात आला.

तसेच, ब्लॅक काचा व रंगीत काचा वापरणाऱ्या ४ वाहनधारकांवर कारवाई करून २,००० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. नागरिकांनी आपली वाहने केवळ एकेरी लेनमध्येच ठेवावीत, रॉंग साईडने वाहन चालवू नये, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा राहुरी पोलीस स्टेशनच्या वाहतूक विभागाने दिला आहे. तसेच वाहनांवरील रंगीत व ब्लॅक काचा तात्काळ काढून टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर श्री. सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग श्री. जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे (राहुरी पोलीस स्टेशन) तसेच वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार भाऊसाहेब आव्हाड, पोलीस हवालदार संतोष ठोंबरे, रमेश दरेकर, बापू फुलमाळी यांनी केली आहे.

राहुरी पोलिसांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, नियमभंग करणाऱ्यांवर पुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!