SR 24 NEWS

सामाजिक

भोपाळा येथे मोफत आरोग्य शिबिर उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न

Spread the love

नायगाव प्रतिनिधी/धम्मदिप भद्रे : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य विमा योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत नायगाव तालुक्यातील भोपाळा येथे आयोजित करण्यात आलेले मोफत आरोग्य शिबिर मोठ्या उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडले. या शिबिरामध्ये तब्बल १९७ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच ७८ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली असून त्यापैकी २६ रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत. संबंधित रुग्णांवर नांदेड येथे लवकरच मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्र माजरमच्या वतीने ५५ आयुष्मान कार्ड व वयोवंदन कार्डचे ऑनलाईन नोंदणी काम करण्यात आले. शिबिरामध्ये हृदयरोग, किडनी विकार, मधुमेह, कर्करोग, थायरॉईड, रक्तदाब तसेच इतर गंभीर आजारांबाबत तपासणी, उपचार व मार्गदर्शन करण्यात आले. पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहितीही देण्यात आली.

नांदेड येथील अपेक्षा रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अर्जुन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित होती. यामध्ये डॉ. नितीन जकलवार, डॉ. शिवाजी वासरे, डॉ. केशव चोपडे, डॉ. गजानन गुंडे तसेच लायन्स नेत्र रुग्णालय जगमवाडीचे डॉ. कृष्णा मेडेवार व त्यांची टीम सहभागी झाली होती. प्राथमिक आरोग्य केंद्र माजरमचे वैद्यकीय अधिकारी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागातील कर्मचारी व आशा वर्कर्स यांनीही सक्रिय सहभाग नोंदविला.

या शिबिरामध्ये ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी विविध आजारांची मोफत तपासणी करण्यात आली. तसेच रुग्णांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोपाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात भोपाळा ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व डॉक्टरांच्या टीमचे व आयोजक अवकाश पाटील धुप्पेकर यांचे स्वागत करण्यात आले.

प्रास्ताविकात अवकाश पाटील धुप्पेकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानत भविष्यातही अशा प्रकारचे मोफत आरोग्य शिबिर राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. या शिबिरास सरपंच देविदासभाऊ राठोड, माजी सरपंच आनंदराव बावने, पोलिस पाटील हनमंत वाघमारे, पत्रकार सदाशिव आडेलवाड, भिमराव गोदमगावे, बाळू पाटील, विश्वंभरआप्पा स्वामी, संदीप हाळणे, आकाश हत्तिनगरे, चांदू बनसोडे, रोहित वाघमारे यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. विशेषतः महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षणीय ठरला.

एकूणच हे मोफत आरोग्य शिबिर सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरले असून ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना नागरिकांतून व्यक्त करण्यात येत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!