नांदेड प्रतिनिधी/धम्मदिप भद्रे : राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी तख्त सचखंड श्री हजूर साहिब आणि पवित्र गोदावरी नदी काठावरील सांस्कृतिक परिदृश्याचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश व्हावा , नांदेडला पवित्र शहर हॉलिसिटी करावी यासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांना महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. भारत सरकारच्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने (ASI) खा. डॉ. गोपछडे यांच्या पत्राची सकारात्मक दखल घेत या प्रस्तावास पुढे नेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे महासंचालक यदुबीर सिंह रावत यांनी खासदार डॉ. गोपछडे यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे की, “तख्त सचखंड श्री हजूर साहिब आणि पवित्र गोदावरी नदीकाठावरील सांस्कृतिक परिदृश्य” सध्या युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट नसले तरी त्याचे ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन हा विषय आवश्यक कार्यवाहीसाठी महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाकडे पाठविण्यात आला आहे.
पत्रात पुढे स्पष्ट करण्यात आले आहे की, कोणत्याही स्थळाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश होण्यासाठी त्या स्थळाने उत्कृष्ट वैश्विक मूल्य (Outstanding Universal Value), प्रामाणिकता (Authenticity) आणि अखंडता (Integrity) यांसह युनेस्कोने निश्चित केलेले निकष पूर्ण करणे आवश्यक असते. तसेच नामांकन प्रक्रियेपूर्वी प्रस्तावित स्थळाचे प्राथमिक मूल्यमापन (Preliminary Assessment) करणे आणि त्याचा तात्पुरत्या यादीत (Tentative List) समावेश करणे ही देखील अनिवार्य प्रक्रिया आहे.
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने आपल्या पत्रात खासदार डॉ. गोपछडे यांना आश्वस्त केले आहे की, महाराष्ट्र शासनामार्फत आवश्यक कागदपत्रे आणि सर्व निकषांची पूर्तता करून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर युनेस्को नामांकन प्रक्रियेस पुढे नेण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
उल्लेखनीय आहे की, खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी पंतप्रधान कार्यालय तसेच संबंधित केंद्रीय मंत्रालयांकडे हा विषय प्राधान्याने मांडला होता. त्यांचे मत आहे की, तख्त सचखंड श्री हजूर साहिब, जे शीख धर्मातील पाच तख्तांपैकी एक अत्यंत पवित्र तख्त आहे, तसेच गोदावरी नदीशी निगडित संपूर्ण सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा ही केवळ महाराष्ट्राची नव्हे तर संपूर्ण भारताची अमूल्य सांस्कृतिक धरोहर आहे. या स्थळाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्यास जागतिक स्तरावर त्याची ओळख, प्रतिष्ठा आणि धार्मिक-सांस्कृतिक पर्यटनाचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वृद्धिंगत होईल.
यावेळी खा. डॉ. गोपछडे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र शासनाने यापूर्वी महाराष्ट्रातील बारा ऐतिहासिक गडकिल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळवून देण्यासाठी सर्वंकष नियोजन, तांत्रिक दस्तऐवजीकरण आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याचप्रमाणे तख्त सचखंड श्री हजूर साहिब–गोदावरी सांस्कृतिक परिदृश्याच्या प्रस्तावासाठी आवश्यक सर्व निकषांची पूर्तता करून महाराष्ट्र शासन हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी सातत्याने कार्यरत असून, महाराष्ट्र शासनाकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर हा विषय युनेस्कोसमोर प्रभावीपणे आणि रीतसर मांडण्यासाठी आवश्यक ती भूमिका बजावेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
खा. डॉ. गोपछडे म्हणाले की, तख्त सचखंड श्री हजूर साहिब–गोदावरी सांस्कृतिक परिदृश्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळवून देणे हे केवळ एका व्यक्तीचे किंवा संस्थेचे कार्य नसून केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, शीख समाजासह सर्वधर्मीय समाज, वारसा तज्ज्ञ, इतिहास संशोधक आणि स्थानिक समाज यांच्या संयुक्त प्रयत्नांतून साकार होणारे राष्ट्रीय महत्त्वाचे अभियान आहे. सर्व संबंधित घटकांनी समन्वयाने कार्य केल्यास नांदेडच्या या अद्वितीय आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाला जागतिक स्तरावर योग्य स्थान प्राप्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाकडून प्राप्त झालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला नवी गती मिळाली असून, नांदेडच्या या जागतिक महत्त्वाच्या वारशाला भविष्यात युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा मान मिळण्याच्या आशा अधिक बळकट झाल्या आहेत. हा उपक्रम केवळ नांदेड आणि महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर भारताच्या सांस्कृतिक वारशाच्या जतन, संवर्धन आणि जागतिक प्रतिष्ठावृद्धीसाठी एक ऐतिहासिक टप्पा ठरणार असल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.
तख्त सचखंड श्री हजूर साहिब , हॉलिसिटीसह गोदावरी जागतिक वारसा यादीत समावेश करण्याच्या प्रक्रियेला गती : खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या प्रयत्नांना मोठे यश

0Share
Leave a reply












