नांदेड प्रतिनिधी/ धम्मदिप भद्रे : पुणे–नांदेड तसेच हैदराबाद–नांदेड वंदे भारत सेवा तात्काळ सुरू करावी , हजूर साहिब नांदेड येथे वंदे भारत आणि अमृत भारत गाड्यांसाठी रेल्वे कोच, वंदे भारत, अमृत भारत मेंटेनन्स देखभाल डेपो उभारण्यात यावे. नांदेड इलेक्ट्रिक लोको ट्रिप शेडचे काम लवकर पूर्ण करण्यात यावे. नांदेड रेल्वे स्थानकावरील रेल्वे पिट लाईन मालटेकडी रेल्वे स्थानकाकडे स्थलांतरित करून मालटेकडी रेल्वे स्थानकाचा सर्व आवश्यक रेल्वे सुविधांसह विकास करावा अशी मागणी खा. डॉ. अजित गोपाछडे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
खा. डॉ. अजित गोपछडे यांनी काल दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी.मराठवाड्यातील दीर्घकालीन रेल्वे विकासाला, धार्मिक पर्यटनाला, औद्योगिक प्रगतीला आणि आधुनिक रेल्वे पायाभूत सुविधांना नवी दिशा देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारसमोर रेल्वे विकासाचे व्हिजन मांडले आहे. त्यांनी नांदेड–लातूर रोड तथा नांदेड-बिदर रेल्वे मार्गाच्या कामाला गती देणे, बोधन–बिलोली–नरसी–लातूर रोड (१३४ कि.मी.) सर्वेक्षण झालेल्या रेल्वेमार्गास मंजुरी देणे तसेच आगामी रेल्वे अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्याची मागणी प्रमुखत्वाने केली. तसेच धर्माबाद रेल्वे स्थानकाचे नामकरण परमपूज्य डॉ. केशव बळीराम हेडगेवार रेल्वे स्थानक असे करण्याची विनंतीही केली.
हजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकाचा जागतिक दर्जाचे, आधुनिक, हरित व पर्यावरणपूरक रेल्वे स्थानक म्हणून विकास करण्याची मागणी करताना त्यांनी स्थानक परिसरात पर्यटक माहिती केंद्र, सौर ऊर्जा प्रणाली, पावसाच्या पाण्याचे संकलन, दोन्ही प्रवेशद्वारांवर उद्याने, कारंजे, सुशोभीकरण, आधुनिक स्वच्छता व्यवस्था, डिजिटल माहिती प्रणाली, मल्टीलेव्हल पार्किंग, स्वतंत्र प्रतीक्षालये आणि उच्च दर्जाच्या प्रवासी सुविधा उपलब्ध करण्याची आवश्यकता व्यक्त केली. तसेच स्थानक पुनर्विकासापूर्वी दोन नवीन प्लॅटफॉर्म उभारणे आणि तख्त हजूर साहिबसह नांदेडच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक वारशाचे दर्शन घडविणाऱ्या वास्तुशिल्पीय संकल्पनांचा विकास आराखड्यात समावेश करण्याचा आग्रह धरला.
रेल्वे संपर्क विस्ताराच्या दृष्टीने जालना – नांदेड – काचीगुडा – तिरुपती दैनिक “पुष्करिणी एक्सप्रेस”, नांदेड–सावंतवाडी द्विसाप्ताहिक एक्सप्रेस तसेच हजुर साहिब नांदेड-धुबरी साहिब-तीनसुकिया पूर्वोत्तर भारतासाठी नवीन अमृत भारत रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय पूर्णा–पटना एक्सप्रेस त्रिसाप्ताहिक करणे, हजूर साहिब नांदेड–अंब अंदौरा आणि नांदेड–संत्रागाछी एक्सप्रेस द्विसाप्ताहिक करणे तसेच बंगळुरू–नांदेड एक्सप्रेस वाराणसीपर्यंत वाढविण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला.
खा. डॉ. गोपछडे यांनी नांदेड–मुंबई वंदे भारतचा प्रवास कालावधी आठ तासांच्या आत आणणे, नांदेड–जालना रेल्वे मार्गावर १३० कि.मी. प्रतितास सेक्शन स्पीड मंजूर करणे तसेच अंकाई, लातूर रोड आणि परळी वैजनाथ बायपास रेल्वे प्रकल्पांना गती देण्याची मागणी केली. याचबरोबर उमरी–धर्माबाद–बासर रेल्वे मार्गावरील वाढती वाहतूक आणि जनसुरक्षा लक्षात घेऊन रेल्वे अंडरब्रिजचे काम तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता त्यांनी रेल्वेमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.
धर्माबाद रेल्वे स्थानकाचे नामकरण प.पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार रेल्वे स्थानक असे करण्याची विनंतीही खा. डॉ. अजित गोपाछडे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली.
नांदेड येथे रेल्वे कोच, वंदे भारत, अमृत भारत मेंटेनन्स देखभाल डेपो उभारा, विविध मागण्यांसाठी खा . डॉ. अजित गोपछडे यांनी घेतली केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट

0Share
Leave a reply












