राहुरी प्रतिनिधी (ज्ञानेश्वर सुरशे ) – मानोरी ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक २ मधील सदस्य कै. सुनिल आनंदा पोटे यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकारण तापले असून, जनसेवा मंडळाचे कार्यकर्ते रवींद्र आढाव यांच्यावर खालच्या पातळीचे राजकारण केल्याचा गंभीर आरोप सुरज नामदेव पोटे यांनी केला आहे.
मानोरी ग्रामपंचायतच्या प्रभाग क्रमांक २ चे ग्रामपंचायत सदस्य कै. सुनिल आनंदा पोटे यांचे २०२३ मध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी एप्रिल २०२६ मध्ये पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीत जनसेवा मंडळाने उमेदवार उभा केल्याने हा वाद निर्माण झाला आहे.
सुरज पोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१७ साली पंचायत समिती आरडगाव गणाच्या निवडणुकीत कै. सुनिल पोटे हे शिवसेनेचे उमेदवार होते, तर रवींद्र आढाव हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. त्या वेळी आढाव यांनी पोटे यांच्या निवासस्थानी जाऊन उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर कै. पोटे यांनी मोठेपणा दाखवत, तसेच पक्षश्रेष्ठींची नाराजी पत्करून उमेदवारी मागे घेतली होती, असा दावा त्यांनी केला.
मात्र, २०२६ च्या पोटनिवडणुकीत जनसेवा मंडळाने उमेदवार उभा करून त्या उपकारांची परतफेड ‘राजकीय पातळी घसरवून’ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. “जर २०१७ साली कै. पोटे यांनी उमेदवारी कायम ठेवली असती, तर आढाव यांना निवडणुकीत फटका बसला असता,” असेही सुरज पोटे यांनी म्हटले आहे.
याशिवाय, रवींद्र आढाव यांनी पंचायत समिती सदस्य आणि काही काळ उपसभापती पद भूषवले असतानाही त्यांच्या कार्यकाळात ठोस विकासकामे झाली नसल्याचा आरोपही करण्यात आला. “गावात मोजकी बाके व काही स्ट्रीट लाईट यापलीकडे कोणतेही लक्षणीय काम झाले नाही. निवडणुकीपुरत्या पोकळ आश्वासनांचा आधार घेतला जात आहे,” अशी टीका करण्यात आली.
दरम्यान, या सर्व आरोपांवर जनसेवा मंडळ किंवा रवींद्र आढाव यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणावर पुढील काळात राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मानोरीत ग्रामपंचायत पोटनिवडणुकीवरून राजकीय वाद ; जनसेवा मंडळावर ‘खालच्या पातळीचे राजकारण’ केल्याचा सुरज पोटे यांचा आरोप

0Share
Leave a reply













