SR 24 NEWS

इतर

जवाहर महाविद्यालयास विद्यापीठाकडून ‘ए’ ग्रेड; शैक्षणिक गुणवत्तेचा गौरव

Spread the love

तुळजापूर प्रतिनिधी ( चंद्रकांत हगलगुंडे) : येथील जवाहर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत झालेल्या शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षणात ‘ए’ ग्रेड प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या गुणवत्तेवर विद्यापीठाने अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे.या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वास माने, अंकेक्षण प्रमुख प्रा. डॉ. सहदेव बिराजदार तसेच विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. अंकुश कदम यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे संस्थेचे अध्यक्ष भारत कस्तुरे, सचिव रामचंद्र आलुरे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य प्रा. भालचंद्र बिराजदार आणि ज्येष्ठ विधिज्ञ लक्ष्मीकांत पाटील यांनी अभिनंदन केले.

याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी म्हणाले की, शिक्षणमहर्षी सी. ना. आलुरे गुरुजी यांनी ग्रामीण भागातील वंचित घटकांना व मुलींना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या विचारांचेच आम्ही पाईक आहोत. गुरुजींच्या विचारांचे आचरण, संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या उत्तम पायाभूत सुविधा, उच्च दर्जाची शैक्षणिक गुणवत्ता तसेच प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांसाठी राबविलेले विविध नवोपक्रम यामुळे विद्यार्थी-केंद्रित शिक्षण देण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न महाविद्यालयाने केला आहे.

यावेळी सचिव रामचंद्र आलुरे यांनीही महाविद्यालयाच्या यशाचा गौरव करत सर्व घटकांना शुभेच्छा दिल्या. ‘ए’ ग्रेड प्राप्तीमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा मिळाली असून विद्यार्थ्यांसाठी अधिक गुणवत्तापूर्ण संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!