श्रीरामपूर प्रतिनिधी / रंगनाथ तमनर : कडीत बुद्रुक गावातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले स्मशानभूमीचे काम अखेर सुरू करण्यात आले असून त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. यापूर्वी एखादी घटना घडल्यानंतर स्मशानभूमीची तातडीने साफसफाई करावी लागत होती. अंत्यविधीच्या वेळी येणाऱ्या पाहुणे व गावकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने या कामाची मागणी ग्रामसभेत सातत्याने होत होती.
ग्रामस्थांच्या वारंवार मागणी व तक्रारींची दखल घेत सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर या कामाला मंजुरी मिळाली. अहिल्यानगरचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या 25-15 जिल्हा नियोजन निधीतून, तसेच माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रयत्नातून स्मशानभूमीच्या कामासाठी रु. 10 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे.
या कामाचे भूमिपूजन प्रवरा सहकारी बँकेचे विद्यमान संचालक व माजी सरपंच भाऊसाहेब वडीतके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच ज्योतीताई शिंदे, यशवंत नागरी पतसंस्थेचे मार्गदर्शक व विद्यमान संचालक, माजी उपसरपंच रामदास नारायण वडीतके, माजी सरपंच शांतवन बनसोडे, माजी सरपंच पांडुरंग शिंदे, रावसाहेब वडीतके, अशोक वडीतके, बाळासाहेब होन, आबासाहेब वडीतके, विठ्ठल होन, ग्रामसेवक गायकवाड भाऊसाहेब, कर्मचारी शिवाजी मेनगर, वैभव होन यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
स्मशानभूमीचे काम सुरू झाल्याने अंत्यविधीच्या वेळी होणाऱ्या अडचणी दूर होणार असून गावातील मूलभूत सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण भर पडणार आहे, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
Leave a reply













