SR 24 NEWS

सामाजिक

केंदळ बुद्रुकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी; युवकांना व्यावसायिक मार्गदर्शनाने प्रेरणा

Spread the love

राहुरी प्रतिनिधी : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी जगभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्याच अनुषंगाने केंदळ बुद्रुक येथे शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने जयंती मोठ्या थाटामाटात, पारंपारिक पद्धतीने आणि विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण व आरतीने करण्यात आली. टाळ-मृदुंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष करत वातावरण शिवमय झाले होते. गावातील विद्यार्थी, तरुण व व्यावसायिकांनी लेझीम नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी गावातील जे युवक अथक परिश्रमातून प्रशासकीय सेवेत रुजू झाले आहेत, त्यांचा शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सत्कार व सन्मान करण्यात आला. नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, त्यांनीही अभ्यास व कष्टाच्या जोरावर उच्च पदांवर पोहोचावे, हा या सत्कारामागील उद्देश होता. तसेच प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय कार्य करून सेवानिवृत्त झालेल्या मान्यवरांचाही गौरव करण्यात आला.

शिवजयंती निमित्ताने युवकांसाठी विशेष व्यावसायिक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राहुरी येथील सुप्रसिद्ध तुतारी मिसळ हाऊसचे सर्वेसर्वा श्री. आदेश जाधव यांनी “शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य – आजच्या युवकांसाठी प्रेरणास्थान” या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. शिवरायांच्या दूरदृष्टी, नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि नेतृत्वगुणांचा आजच्या उद्योजकांनी आदर्श घ्यावा, असे त्यांनी सांगितले. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच सुरू असलेल्या व्यवसायात वाढ करण्यासाठी आवश्यक असलेल्या नियोजन, धैर्य व सातत्य याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमानंतर श्री. शरद किसनराव तारडे यांच्या वतीने अन्नदानाची पंगत आयोजित करण्यात आली. गावातील सर्व क्षेत्रातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रम यशस्वी केला.दरवर्षी नवनवीन उपक्रम राबवून समाजामध्ये आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न शिवजयंती उत्सव समिती करत असून, यावर्षीही व्यावसायिक मार्गदर्शनासारख्या उपक्रमामुळे शिवजयंतीला वेगळे आणि प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले. सर्व स्तरांतून समितीच्या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!