SR 24 NEWS

शिक्षण विषयी

मानोरीत एसएससी परीक्षेला उत्साहात प्रारंभ; अंबिका विद्यालय केंद्रावर ३२० विद्यार्थी, कडक बंदोबस्तात पहिला पेपर सुरळीत

Spread the love

मानोरी (राहुरी ) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या एसएससी (इयत्ता दहावी) २०२६ परीक्षेला शुक्रवार (दि. २०) पासून राज्यभर उत्साहात सुरुवात झाली. राहुरी तालुक्यातील मानोरी येथील केंद्र क्रमांक २२०६, अंबिका माध्यमिक विद्यालय प्रशाला येथे एकूण ३२० विद्यार्थी परीक्षेला बसल्याची माहिती केंद्रप्रमुख नवनाथ महापुडे यांनी दिली.

परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मराठी विषयाचा पेपर शांत, शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सकाळपासूनच परीक्षा केंद्र परिसरात विद्यार्थ्यांची लगबग पाहायला मिळाली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता, आत्मविश्वास आणि सकारात्मकतेचे भाव स्पष्टपणे दिसून येत होते.

या केंद्रावर अंबिका माध्यमिक विद्यालय (मानोरी), श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय (आरडगाव), माध्यमिक विद्यालय (कारवाडी), संत जोसेफ स्कूल (केंद्रळ), वीरभद्र माध्यमिक विद्यालय (केंद्रळ बुद्रुक), गाडगे महाराज आश्रम शाळा (वळण), कै. मथुराबाई धुमाळ माध्यमिक विद्यालय (मुसळवाडी), संत कदम माऊली विद्यालय (पाथरे खुर्द) तसेच ज्ञानदीप इंग्लिश मीडियम (वाजुळेपोई) आदी शाळांतील विद्यार्थी परीक्षा देत आहेत. राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र सोयीचे ठरत असल्याची प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली.

परीक्षेच्या पहिल्याच दिवशी डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर खुळे, संचालक ज्ञानेश्वर पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आढाव, भाऊसाहेब आढाव, पत्रकार सोमनाथ वाघ यांच्यासह विविध मान्यवरांनी केंद्राला भेट देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. “विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी, वेळेचे योग्य नियोजन करावे आणि उत्तम यश संपादन करावे,” असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले.

परीक्षा पारदर्शक व कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी केंद्रप्रमुख नवनाथ महापुडे, उपकेंद्रप्रमुख बाबासाहेब विधाटे तसेच बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर गणेश म्हसे यांनी नियोजनाची जबाबदारी सांभाळली. विद्यार्थ्यांची तपासणी करूनच वर्गात प्रवेश देण्यात आला. केंद्र परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस बंदोबस्ताची जबाबदारी गादीकर व बोरुडे यांनी पार पाडली.

गटशिक्षणाधिकारी मोहनीराज तुंबारे व विस्तार अधिकारी निर्मला गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी तालुक्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर नियोजनबद्ध पद्धतीने परीक्षा पार पडत आहे.एकूणच, मानोरी येथील अंबिका विद्यालय केंद्रावर एसएससी परीक्षेला शांत, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला असून विद्यार्थ्यांच्या यशासाठी शिक्षक, प्रशासन व पालक सज्ज असल्याचे चित्र पहिल्याच दिवशी पाहावयास मिळाले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!