इंदापूर प्रतिनिधी / प्रवीण वाघमोडे : २८ फेब्रुवारी १९२८ रोजी महान शास्त्रज्ञ सी. व्ही रमन यांनी भौतिकशास्त्रातील महत्त्वपूर्ण शोध लावला, ज्याला ‘रामन इफेक्ट’ असे नाव देण्यात आले. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ २८ फेब्रुवारी हा दिवस देशभरात ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर शनिवार, दि. २८/०२/२०२६ रोजी राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान संचलित विठ्ठलराव थोरात इंग्लिश मीडियम स्कूल येथे भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रदर्शनात तब्बल १२६ विविध विज्ञान प्रकल्पांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी उत्साहात केले. प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे सचिव विजयभैय्या थोरात, संतोष थोरात सर आणि अजय थोरात सर यांच्या हस्ते संपन्न झाले. या उपक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष बापूराव थोरात सर, संचालिका संगीताताई थोरात तसेच प्राचार्या वंदना थोरात मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
सध्याचे युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचे असल्याने विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सौरऊर्जेचा वापर, स्वयंचलित पथदिवे, टाकाऊ वस्तूंमधून टिकाऊ वस्तू, शेतीची आधुनिक उपकरणे, हरित शेती तंत्रज्ञान तसेच इतर नवनवीन संकल्पनांवर आधारित प्रकल्प सादर केले. विशेषतः सोलार ऊर्जा वापर, स्वयंचलित पथदिवे आणि हरित शेती उपकरणे हे प्रकल्प उपस्थितांच्या कुतूहलाचा विषय ठरले.या प्रकल्पांमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना मिळून त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास निश्चितच मदत होईल, अशी आशा संस्थेचे अध्यक्ष बापूराव थोरात यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदाळे मॅडम यांनी केले. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले ठेवण्यात आल्याने नागरिकांसह परिसरातील शालेय विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रदर्शनाचा लाभ घेतला.तसेच यावेळी ‘रंगोत्सव सेलिब्रेशन अँड ऑर्गनायझेशन फॉर इंटरनॅशनल कॉम्पिटिशन, मुंबई फाउंडेशन’ यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय कला स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत विद्यालयातील सहा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून सर्व सहाही विद्यार्थ्यांची इंटरनॅशनल स्तरावर निवड झाल्याची गौरवपूर्ण बाब आहे. यावेळी विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करून सन्मानित करण्यात आले.
एकूणच, राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित या विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड, जिज्ञासा आणि संशोधनाची प्रेरणा निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
Homeशिक्षण विषयीविठ्ठलराव थोरात इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन उत्साहात
विठ्ठलराव थोरात इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन उत्साहात

0Share
Leave a reply












