SR 24 NEWS

सामाजिक

राजवाडा परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीसाठी भव्य तयारी, जयभीम मित्र मंडळाच्या नियोजन बैठकीत एकजुटीचा निर्धार; पाच दिवसांच्या उत्सवाची घोषणा

Spread the love

राहुरी प्रतिनिधी : राजवाडा परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून जयभीम मित्र मंडळाच्या वतीने आयोजित नियोजन बैठक उत्साहात पार पडली. ज्येष्ठ नागरिक, तरुण कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत यंदाचा जयंती उत्सव अधिक भव्य, शिस्तबद्ध आणि समाजाभिमुख पद्धतीने साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

बैठकीच्या प्रारंभी गतवर्षी साजऱ्या झालेल्या जयंती उत्सवाचे परीक्षण करण्यात आले. यंदाच्या उत्सवात अधिक सांस्कृतिक, संघटित आणि प्रेरणादायी कार्यक्रमांचा समावेश करण्यावर सविस्तर चर्चा झाली. चर्चेनंतर उत्सवासाठी विविध पदांवर सर्वानुमते निवडी जाहीर करण्यात आल्या.

निवड झालेले पदाधिकारी पुढीलप्रमाणे : अध्यक्ष  विलास नाना साळवे, उपाध्यक्ष – पिंटू नाना साळवे, खजिनदार – दादू साळवे, कार्याध्यक्ष – दिपक रामजी साळवे

नवीन अध्यक्ष विलास नाना साळवे यांनी सर्वांचे आभार मानत, “जयंती उत्सवाला समाजभिमुख, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी स्वरूप देण्याचा आमचा संकल्प आहे,” असे स्पष्ट केले.

बैठकीत कार्याध्यक्ष दिपक रामजी साळवे यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत राजवाडा परिसरातील सर्व ज्येष्ठ व तरुणांनी गटबाजी, मतभेद आणि राजकारण बाजूला ठेवून एकजुटीने उत्सव साजरा करण्याचा निर्धार व्यक्त केला.

खजिनदार दादू साळवे म्हणाले, “राजवाडा कुटुंब म्हणून एकत्र येणे हीच आमची खरी ताकद आहे. समाजातील एकी जपण्यासाठी जयंती हा एक मोठा अवसर आहे.”

राजवाडा व प्रभागातील नगरसेवक अरुण साळवे यांनी यंदा जयंती उत्सवाला पाच दिवसांचे भव्य स्वरूप देण्यात येणार असल्याची घोषणा केली. या कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, समाजजागृती उपक्रम, बौद्ध धम्मवाचन, प्रभातफेरी, स्पर्धा, व्याख्याने तसेच सामुदायिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

उपाध्यक्ष पिंटू नाना साळवे यांनीही सर्वांनी एकमुखीपणे उत्सव अधिक भव्य व प्रेरणादायी करण्याचे आश्वासन दिले. बैठकीची सुरुवात अजय सुरेश साळवे आणि भुषण गोरक्षनाथ साळवे यांच्या मार्गदर्शनपर विचारांनी झाली.

या बैठकीस नगरसेवक अरुण साळवे, माजी नगरसेवक संजय साळवे तसेच परिसरातील अनेक मान्यवर, महिला मंडळ, तरुण वर्ग, जयभीम मित्र मंडळाचे पदाधिकारी आणि बाबासाहेबांच्या विचारांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यंदाचा १३५ वा जयंती उत्सव एकजुटीचा, सामाजिक बांधिलकीचा आणि प्रेरणेचा संदेश देणारा ठरणार असल्याचे चित्र या बैठकीतून स्पष्ट झाले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!