SR 24 NEWS

राजकीय

नांदेड येथे उपसंचालक,भूमी अभिलेख कार्यालयास मंजुरी : खा. डॉ.अजित गोपछडे यांच्या पाठपुराव्याला यश, नांदेड, हिंगोली, लातूर व धाराशिव जिल्ह्यांना मिळणार स्वतंत्र प्रशासकीय सुविधा

Spread the love

नांदेड प्रतिनिधी / धम्मदिप भद्रे : राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी मुख्यमंत्री, महसूलमंत्री तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, नांदेड येथे उपसंचालक, भूमी अभिलेख कार्यालय स्थापन करण्यास महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे, पूर्वी छत्रपती संभाजीनगर येथून कार्यरत असलेल्या विभागीय कार्यक्षेत्राचे प्रशासकीय विभाजन करून नांदेड, हिंगोली ,लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांसाठी स्वतंत्र उपसंचालक कार्यालय नांदेड येथे निश्चित करण्यात अखेर मंजूर करण्यात आले आहे.

महसूल व वन विभागाच्या दिनांक २० मे २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार भूमि अभिलेख विभागातील सुधारित आकृतीबंधास मंजुरी देण्यात आली असून, राज्यात नवीन कार्यालयांच्या निर्मितीस मान्यता देण्यात आली आहे. त्याअंतर्गत नांदेड येथे नवीन उपसंचालक, भूमी अभिलेख कार्यालयाच्या मुख्यालयाबाबत ठोस निर्णय घेण्यात आला आहे.

या संदर्भात खा. डॉ. अजित गोपछडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मागणीसाठी निवेदन सादर केले होते. पूर्वी छत्रपती संभाजी नगर येथे असलेले मुख्यालय हे दळणवळणासाठी नांदेड , लातूर , हिंगोली आणि धाराशिवसाठी दूर होते. त्यामुळे नांदेड येथे हे मुख्यालय व्हावे यासाठी खा. डॉ. गोपछडे यांनी यशस्वी पाठपुरावा केला आहे. नांदेड हे हिंगोली , लातूर आणि धाराशिव या चारही जिल्ह्यासाठी प्रवासासाठी सोयीस्कर ठरणार आहे. परिणामी नागरिकांची कामे वेळेत होतील. पैशाची आणि श्रमाची बचत होईल हे ही निदर्शनास आणून दिले. 

 त्यामुळे नांदेड येथे स्वतंत्र उपसंचालक कार्यालय मंजूर झाल्याने नांदेड, हिंगोली, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांना अधिक जलद, सुलभ आणि प्रभावी प्रशासकीय सेवा उपलब्ध होणार आहेत. खा. डॉ. अजित गोपछडे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर नांदेडला हे महत्त्वपूर्ण प्रशासकीय कार्यालय मंजूर केले, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे खा. डॉ. अजित गोपछडे यांनी विशेष आभार मानले आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!