SR 24 NEWS

राजकीय

वावरथ येथील सेवा संस्थेचे पीक कर्ज थकवल्याने अध्यक्ष अपात्र; अप्पासाहेब बाचकर यांचे संचालक पद रद्द

Spread the love

राहुरी प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील वावरथ येथील सेवा संस्थेचे विद्यमान अध्यक्ष अप्पासाहेब दादा बाचकर यांचे संचालक पद थकीत कर्ज प्रकरणी रद्द करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश राहुरीचे सहाय्यक निबंधक (सहकार) रावसाहेब खेडकर यांनी दिला आहे. यासंदर्भातील सविस्तर माहिती अशी की, संस्थेचे अध्यक्ष अप्पासाहेब बाचकर यांनी आडसाली ऊस पिकासाठी संस्थेकडून पीक कर्ज घेतले होते. संबंधित कर्जाची परतफेड ३० जूनपर्यंत करणे बंधनकारक असताना त्यांनी निर्धारित मुदतीत कर्जफेड केली नव्हती. त्यामुळे कर्ज थकीत राहिले होते.

या पार्श्वभूमीवर संस्थेचे सभासद संजय कृष्णा बाचकर व अविनाश बाचकर यांनी सहाय्यक निबंधक (सहकार), राहुरी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. थकीत कर्जदार व्यक्तीला सहकारी संस्थेच्या संचालक मंडळावर राहण्याचा अधिकार नसल्याचा मुद्दा तक्रारीत उपस्थित करण्यात आला होता.तक्रारीची दखल घेत सहाय्यक निबंधक कार्यालयाने सुनावणी घेतली. यावेळी संस्थेच्या सचिवांचा अहवाल तसेच कर्जफेडीबाबतची कागदपत्रे तपासण्यात आली. त्यानुसार संबंधित कर्जाची रक्कम नियोजित तारखेनंतर म्हणजेच १८ सप्टेंबर २०२५ रोजी भरल्याचे आढळून आले. नियमानुसार मुदतीत कर्जफेड न केल्यामुळे अप्पासाहेब बाचकर यांचे संचालक पद रद्द करण्याचा आदेश देण्यात आला.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच त्यांची अध्यक्षपदी निवड झाली होती. मात्र निवडीनंतर अल्पावधीतच पद रद्द झाल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे सहकारी संस्थांमधील आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक ठेवण्याची गरज अधोरेखित झाली असून, सत्तेचा गैरवापर सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!