SR 24 NEWS

सामाजिक

उत्तम प्रशासक व प्रजाहितदक्ष राजा – छत्रपती शिवाजी महाराज : प्रा. डॉ. मल्लिनाथ बिराजदार

Spread the love

तुळजापूर प्रतिनिधी  / चंद्रकांत हगलगुंडे : छत्रपती शिवाजी महाराज हे एक उत्तम प्रशासक आणि प्रजाहितदक्ष राजा होते. महाराष्ट्राच्या प्रजेमध्ये श्रीमंती पाहणारा ‘श्रीमंत योगी’ म्हणून त्यांचे स्थान ध्रुवताऱ्यासारखे अढळ आहे. त्र्यलोक्याला पुरून उरणारा तीन अक्षरी मंत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, असे गौरवोद्गार जवाहर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. मल्लिनाथ बिराजदार यांनी काढले.उमरगा-चिवरी येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. आप्पाराव जाधव होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून महेश पाटील व विजयकुमार सामंत उपस्थित होते.

पुढे बोलताना प्रा. बिराजदार म्हणाले की, महाराजांचे नाव घेताच लाखो दीप प्रज्वलित होतात. रयतेचा हा राजा सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यातील मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरविणारा होता. अगदी हुरडा खाऊन जगणाऱ्या गरिबांना एकत्रित करून त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला. शेतकऱ्यांच्या देठालाही हात लावू नका, असा कडक आदेश देत त्यांनी शेती व जनावरांचे संरक्षण केले.

“दिवे मालवून, चुल विझवून झोपा; रात्री ठिणगी उडेल, तेलाच्या मोहामुळे उंदीर पेटती वात घेऊन पळेल आणि गवताच्या गंजी जळून खाक होतील. जनावरांना चारा मिळणार नाही. दुधाविना अंगणात रांगणारी लेकरं उद्या रणांगणात कशी येतील?” अशा उदाहरणातून त्यांनी लोकजीवनाची काळजी घेतल्याचे प्रा. बिराजदार यांनी स्पष्ट केले. राजाचे बळ साधेपणा आणि नैतिकतेत होते. महाराज निर्व्यसनी होते, त्यांचा आहार परिमित होता. सर्वधर्मसमभाव, स्त्रीसन्मान, शेतीविषयक धोरणे, जलव्यवस्थापन, दुष्काळ निवारण आणि निर्यातीवर कडक नियंत्रण अशा अनेक क्षेत्रांत त्यांनी प्रभावी कार्य केले. प्रत्येक पावलावर नियोजन केल्यामुळेच ते यशस्वी ठरले, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी बोलताना बसवेश्वर निसर्गुंडे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजा, आदर्श पुत्र आणि आदर्श पिता होते. जिजाऊंनी शिवबांना जसे घडविले, त्याप्रमाणे आज पालकांनी आपल्या पाल्यांना घडविण्याची गरज आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!