राहुरी (तालुका प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राहुरी शहराध्यक्ष सुनील भट्टड यांची पक्षशिस्तभंग व पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.पक्षाचे सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे यांनी याबाबत प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केले की, भट्टड यांनी पक्षाच्या शिस्तीचा भंग करत व पदाचा गैरवापर करत पक्षाची प्रतिमा मलिन केली आहे. त्यामुळे पक्षाने त्यांना तात्काळ हाकलून लावले असून, यापुढे कोणीही पक्षाच्या नावाचा किंवा पदाचा गैरवापर केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
संबंधित प्रकरणात, भट्टड यांनी जळगाव येथील एका शिरसाट नामक महिलेला फोन करून स्वतःला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे खासगी सहाय्यक असल्याचे सांगितले. यानंतर त्यांनी सदर प्रकरणात महिला सहभाग न घेण्याचा आदेश आहे, असा भासवत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रजनिश नावाच्या व्यक्तीला मदत करण्याची सूचना केली होती.सदर संभाषणाची ध्वनीफीत महिला आयोगाच्या हाती लागल्यानंतर, आयोगाने अहिल्यानगर येथील पोलिस अधिक्षकांना सुनील भट्टड यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
या प्रकारामुळे पक्षाची व सार्वजनिक संस्थांची प्रतिमा मलिन झाल्याचे लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसने भट्टड यांच्यावर ही कठोर कारवाई केली असून, या घटनेमुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राहुरी शहराध्यक्ष सुनील भट्टड यांची पक्षातून हकालपट्टी ; महिला आयोगाच्या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची कारवाई

0Share
Leave a reply












