देवळाली प्रवरा (प्रतिनिधी) – टाकळीमिया रोड परिसरात ॐ चैतन्य कानिफनाथ महाराज यात्रा उत्सवानिमित्त नवनाथ ग्रंथ पारायण सोहळा व भव्य सप्ताह कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १ मार्च ते ८ मार्च २०२६ या कालावधीत हा उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न होणार आहे.
या सप्ताहात दररोज सकाळी नवनाथ ग्रंथ पारायण, विविध धार्मिक विधी व पूजाअर्चा पार पडणार असून सायंकाळी ७ ते ९ या वेळेत नामवंत कीर्तनकारांची कीर्तनसेवा रंगणार आहे. कीर्तनानंतर दररोज महाप्रसादाची पंगत आयोजित करण्यात येणार आहे.
या भक्तिमय सोहळ्यात ह.भ.प. शुभम महाराज कांडेकर, निखिल महाराज बानकर, चैतन्य महाराज मापारे, सुभाष महाराज विधाटे, मधुकर महाराज पवार, बाबा महाराज मोरे, नामदेव महाराज शास्त्री, दुर्गप्रसाद महाराज तिडके आदी मान्यवर कीर्तनकार आपले विचार, प्रवचन व कीर्तनसेवा सादर करणार आहेत.
रविवार दि. ८ मार्च रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत बाबानंद महाराज वीर यांचे काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसाद कार्यक्रमाने सप्ताहाची सांगता करण्यात येणार आहे. या समारोप सोहळ्यास विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
संपूर्ण सप्ताहात भजन, कीर्तन, प्रवचन व धार्मिक कार्यक्रमांची भक्तिमय मेजवानी अनुभवण्याची सुवर्णसंधी भाविकांना मिळणार आहे. या पवित्र सोहळ्यास परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक ॐ चैतन्य कानिफनाथ प्रतिष्ठान, देवळाली प्रवरा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Leave a reply













