राहुरी प्रतिनिधी (सोमनाथ वाघ) : राहुरी तालुक्यातील गुहा परिसरात बिबट्याने थेट घरात प्रवेश केल्याच्या धक्कादायक घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोळसे वस्ती व वाबळे वस्ती परिसरात बिबट्या फिरत असल्याचे ग्रामस्थांना वारंवार दिसत होते. त्यामुळे आधीच भीतीचे वातावरण असताना मंगळवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडलेली घटना अधिकच भितीदायक ठरली.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळच्या सुमारास बिबट्या थेट जगन्नाथ कोळसे यांच्या घरात शिरला. अचानक घरात आलेल्या बिबट्यामुळे कोळसे कुटुंबातील सदस्यांमध्ये गोंधळ उडाला. प्रसंगावधान राखत कुटुंबातील सदस्यांनी तत्काळ सुरक्षित स्थळी धाव घेत आपले प्राण वाचवले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली असून बिबट्याने घरातील काही वस्तूंचे नुकसान केल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसरात बिबट्याचा माग काढण्यासाठी पथकाकडून शोधमोहीम सुरू असून रणनीतीनुसार पिंजरे लावण्यात आले आहेत.दरम्यान, वनविभागाने ग्रामस्थांना रात्रीच्या वेळी बाहेर न फिरण्याचे तसेच जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आवाहन केले आहे.
गावातील भीतीचे वातावरण लक्षात घेता ग्रामस्थांनी तातडीने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे. वनविभाग, स्थानिक पोलीस व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त प्रयत्नांतून परिस्थितीवर नजर ठेवण्यात येत असून बिबट्या जेरबंद करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
Leave a reply













