राहुरी प्रतिनिधी ( ज्ञानेश्वर सुरशे) : राहुरी तालुक्यातील देसवंडी परिसरात देव नदीच्या पात्रातून बेकायदेशीरपणे वाळूची चोरी करणाऱ्या दोन आरोपींना राहुरी पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईत दोन बैलगाड्या आणि वाळू असा एकूण २४,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देसवंडी गावच्या शिवारात असलेल्या देव नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूची चोरी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास पोलिसांनी नदी पात्रात सापळा रचला. यावेळी आरोपी अरुण अशोक कोकाटे आणि राहुल अशोक कोकाटे (दोन्ही रा. देसवंडी) हे दोन बैलगाड्यांच्या सहाय्याने चोरून वाळू वाहतूक करताना मिळून आले. प्रत्येकी ११,००० रुपये किमतीच्या दोन बैलगाड्या आणि साधारण २,००० रुपये किमतीची वाळू असा एकूण २४,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तलाठी सचिन भागचंद कदम यांच्या फिर्यादीवरून आरोपींवर BNS कलम ३०३(२), ३(५) आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ३, १५ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.सदर कारवाई राहुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पो.नि. संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. संभाजी बडे आणि पथकाने केली आहे.
राहुरी तालुक्यात छुप्या मार्गाने वाळू उपसा करणाऱ्यांवर पोलिसांचा छापा; दोन बैलगाड्यांसह मुद्देमाल जप्त

0Share
Leave a reply












