राहुरी प्रतिनिधी (ज्ञानेश्वर सुरशे) – राहुरी तालुक्यात गोवंशाची निर्दयतेने व अवैध पद्धतीने वाहतूक करणाऱ्या ट्रकवर राहुरी पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे ११ लाख २७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुरी-कोल्हार रस्त्यावरील राहुरी फॅक्टरी परिसरातून एक टाटा ट्रक (क्रमांक MH 12 LT 9392) संशयास्पद स्थितीत जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ट्रक थांबवून तपासणी केली असता, ट्रकमध्ये १२ गोवंश (बैल व गायी) अत्यंत अमानुष परिस्थितीत दाटीवाटीने बांधून, कोणतीही चारा-पाणी व्यवस्था न करता कत्तलीच्या उद्देशाने नेले जात असल्याचे आढळून आले.
या कारवाईत पोलिसांनी १० लाख रुपये किमतीचा ट्रक आणि १ लाख २७ हजार ५०० रुपये किमतीचे १२ गोवंश असा एकूण ११,२७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल नदीम मोहम्मद जाफर शेख यांनी फिर्याद दिली असून खालील दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे 1) दिलीप मरीबा खाडे (रा. पळशी, ता. माण, जि. सातारा), 2) गिरीष सचिन जाधव (रा. सातारा) सध्या आरोपी फरार असून त्यांना अटक करण्यात आलेली नाही.या प्रकरणी प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा कायदा १९६० चे कलम ११(१)(ड) अंतर्गत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २६४/२०२६ नुसार नोंद करण्यात आली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य्क फौंजदार गिते करीत आहेत. या कारवाईमुळे राहुरी परिसरातील अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या या धडक कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे.
राहूरीत अवैध गोवंशाची वाहतूक करणारा ट्रक पकडला; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त; गोवंश वाहतुकीप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल

0Share
Leave a reply












