नांदेड प्रतिनिधी / धम्मदिप भद्रे : राज्यसभेचे सदस्य डॉ. अजित गोपछडे यांची १८ व्या लोकसभेच्या कार्यकाळासाठी गठित भारत – सौदी अरेबिया संसदीय मैत्री समूहाच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी ही नियुक्ती केली आहे.
भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील संसदीय संवाद, द्विपक्षीय सहकार्य, सांस्कृतिक आदानप्रदान तसेच धोरणात्मक संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या या समूहात डॉ. गोपछडे यांचा समावेश होणे हे त्यांच्या अभ्यासपूर्ण दृष्टिकोन आणि विकासात्मक नेतृत्वाचे प्रतीक मानले जात आहे. संसदीय कार्यातील सक्रिय सहभाग, विषयांचा सखोल अभ्यास आणि विविध स्तरांवरील प्रतिनिधींशी सुसंवाद राखण्याची क्षमता या गुणांमुळे त्यांची या समूहासाठी निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय संवादात विश्वास, संयम आणि परस्पर आदर या मूल्यांना विशेष स्थान असते, आणि या मूल्यांचे प्रतिनिधित्व करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
या सातत्यपूर्ण राजनयिक परंपरेच्या पार्श्वभूमीवर संसदीय मैत्री समूहांची भूमिका अधिक महत्त्वपूर्ण ठरते. ऊर्जा, व्यापार, गुंतवणूक, प्रवासी भारतीयांचे हित, पर्यटन तसेच विविध क्षेत्रातील भागीदारी या क्षेत्रांत भारत-सौदी अरेबिया संबंध सातत्याने बळकट होत असताना, संसदीय स्तरावरील संवादातून परस्पर समज, सहकार्य आणि विश्वासाचे नवे आयाम विकसित होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
डॉ. गोपछडे यांनी या नियुक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना भारताच्या राष्ट्रीय हितांना सर्वोच्च प्राधान्य देत दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे नमूद केले. तर या निवडीबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपति तथा राज्यसभा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, संसदीय कार्य मंत्री किरण रिजीजू, राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल, डॉ. एल. मुरूगन आदींचे आभार मानले आहेत.
Leave a reply













