तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील युवा नेतृत्व प्रवीण घुगे यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिवपदी निवड झाल्याने तालुक्यासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून युवा कार्यकर्त्यांत विशेष उत्साह दिसून येत आहे. प्रवीण घुगे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या माध्यमातून जिल्हा पातळीपासून राष्ट्रीय मंत्रीपदापर्यंत कार्य करत विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी संघर्षात्मक लढे उभारले. सामाजिक बांधिलकी जपत संघटनात्मक बळ वाढविण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमांमुळे ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना नवे बळ आणि प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
अणदूर गावाला शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रात विशेष ओळख आहे. स्वर्गीय सी. ना. आलूरे गुरुजी, सहकार महर्षी मधुकर चव्हाण तसेच विश्व हिंदू परिषदचे महाराष्ट्र-कर्नाटक राज्य संघटनमंत्री स्वर्गीय भुजंगराव घुगे यांच्या कार्यपरंपरेतून नेतृत्वाची परंपरा पुढे चालत आली आहे. त्याच परंपरेतून प्रवीण घुगे यांच्या रूपाने राज्य नेतृत्वाला संधी मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.प्रवीण घुगे यांनी महाराष्ट्र राज्य बाल हक्क व संरक्षण आयोगाचे अध्यक्ष म्हणून शोषित, वंचित आणि निराधार बालकांसाठी उल्लेखनीय कार्य केले. तसेच भटक्या विमुक्त विकास बोर्डाचे अध्यक्ष म्हणून तळागाळातील घटकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले. संघटन कौशल्य, स्पष्ट विचारसरणी आणि संयमी नेतृत्वशैलीमुळे युवकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला आहे.
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या कार्यात दिसून येतो. संत भगवान बाबा यांच्या वारकरी परंपरेतील संस्कार त्यांच्या जडणघडणीत प्रतिबिंबित होत असल्याचे कार्यकर्त्यांचे मत आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण घुगे राज्यात संघटनात्मक कामाचा ठसा उमटवतील, असा विश्वास कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.
Leave a reply













