SR 24 NEWS

राजकीय

बांगलादेश सीमावर्ती गावात खा. डॉ. अजित गोपछडे यांचा मुक्काम, नागरिक, विद्यार्थी आणि जवानांशी साधना संवाद

Spread the love

नांदेड प्रतिनिधी/धम्मदिप भद्रे : भारताच्या बांगलादेश सीमावर्ती गावांमध्ये खा. डॉ अजित गोपछडे यांनी दुसऱ्यांदा मुक्काम केला आहे. या भागातील अनेक गावांना भेटी देऊन त्या भागातील सामाजिक जीवन समजून घेत तेथील विद्यार्थी , नागरिक आणि भारतीय सैन्यातील जवानांशी त्यांनी संवाद साधला . भारतीय सीमावर्ती भागाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांचे अभिनंदनही केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनप्रतिनिधींना सीमावर्ती गावांना भेट देऊन तेथील नागरिक तसेच सुरक्षा दलातील जवानांशी संवाद साधण्याच्या केलेल्या आव्हानाच्या प्रेरणेतून खा. डॉ. गोपछडे यांनी हा संवाद साधला आहे. खा.डॉ. अजित गोपछडे यांनी पुर्वोत्तर भारतातील त्रिपुरा राज्यातील सीमांत भागाचा दौरा केला. या दौऱ्यात अगरतळा परिसरातील भारत-बांगलादेश सीमेलगत असलेल्या लंकामुरा या गावासह सीमेवरच्या अनेक गावांना भेटी दिल्या. तेथील गावात मुक्काम करून स्थानिक जनजीवन जवळून अनुभवले.

या भेटीत त्यांनी ग्रामीण भागातील जनते सोबत त्यांच्या घरी जेवणाचा आस्वाद घेतला. आपुलकीने संवाद साधत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारच्या विकासात्मक कामा बाबतही चर्चा केली. जनप्रतिनिधी म्हणून या दौऱ्यात केंद्र व राज्य शासनाच्या समन्वित प्रयत्नांतून सीमावर्ती दुर्गम भागांमध्ये होत असलेल्या विकासकामांचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्यात आले. रस्ते, वीजपुरवठा, डिजिटल कनेक्टिव्हिटी, रोजगार, शैक्षणिक आणि आरोग्य सुविधा, सीमा सुरक्षेसाठी काटेरी मजबूत कुंपण व सामाजिक सेवांचा विस्तार यामुळे सीमांत प्रदेशांमध्ये सकारात्मक बदल घडताना दिसत असून हा अनुभव समाधानकारक व अभिमानास्पद ठरल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

गतवर्षी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील सीमावर्ती गावातील भेटीच्या कार्यक्रमात मेघालय राज्यातील डावकी परिसरात भेट दिली होती. त्याच भावनिक सातत्यातून यावर्षी त्रिपुरा राज्यातील सीमेलगत प्रदेशांचा आढावा घेण्यात आला. या भेटीत सीमावर्ती जीवनातील वास्तव , आव्हाने आणि तेथील नागरिकांची राष्ट्रनिष्ठा प्रत्यक्ष अनुभवली . या दौऱ्यादरम्यान सीमा सुरक्षा बलाचे अधिकारी आणि जवानांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला. कठीण हवामान , आव्हानात्मक भौगोलिक परिस्थिती आणि कुटुंबापासून दूर राहून देश रक्षणासाठी अखंडपणे सेवा समर्पण जपणाऱ्या सैनिकांबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी सैनिकांना फळे , मिठाई वाटून त्यांची भावनिक पाठराखण केली. याशिवाय वाघा, अटारी बॉर्डर येथील बेटिंग द रिट्रीट सोहळ्याच्या धर्तीवर अगरतळा बांगलादेश सिमेजवळ आयोजित विशेष समारंभाचे अवलोकन करण्यात आले. याठिकाणी भारतीय सीमेवरील गांव लंकामुरा आणि बांगलादेशातील सरहद्दीवरील गांव अखुरा या दोन्ही सीमेवरील गावांच्या हद्दीत या कार्यक्रमाचे आयोजन होते.

या कार्यक्रमात स्थानिक नागरिक, पर्यटक, सुरक्षा दलातील जवान तसेच सीमेपलीकडील नागरिक व सुरक्षा रक्षक यांचा सहभाग आढळून आला. या प्रेरणादायी सेवा भेटीमुळे सीमा सुरक्षा करणारा प्रत्येक जवान आणि त्या भागात वास्तव्यात असलेला प्रत्येक नागरिक हा राष्ट्राच्या सामर्थ्याचा भक्कम स्तंभ असल्याची जाणीव अधिक दृढ झाली. त्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे असा विश्वासही खा. डॉ अजित गोपछडे यांनी व्यक्त केला.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!