SR 24 NEWS

सामाजिक

मुख्याध्यापक आनंद झावरे समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

Spread the love

विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : महाराष्ट्र राज्यातील दैनिक दैनिक चालू वार्ता वृत्तपत्राच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना गुरुवार दि. १९ फेब्रुवारी रोजी ‘समाजरत्न २०२५’ पुरस्काराने गौरविण्यात आले. पुणे येथील हडपसर परिसरातील दैनिक चालू वार्ता कार्यालयासमोर हा सोहळा उत्साहात आणि शिस्तबद्ध नियोजनात पार पडला.

यावेळी पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील मतिमंद मुलांच्या निवासी शैक्षणिक संस्थेचे मुख्याध्यापक आनंद रावसाहेब झावरे यांना समाजरत्न पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. कार्यक्रमात दैनिक चालू वार्ताचे मुख्य संपादक डि. एस. लोखंडे पाटील, जय मल्हार आर्थिक महामंडळाचे उपाध्यक्ष तथा जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत नाना शितोळे, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे अध्यक्ष डॉ. भावार्थ देखणे महाराज, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रशांत गांधी, स्वराज्य होम्सचे संचालक सुनील शिंदे, संजय भोसले आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. राज्यभरातील विविध क्षेत्रांत कार्य करणारे तब्बल सत्तर पुरस्कारार्थी या सोहळ्यास उपस्थित होते.

मुख्याध्यापक आनंद झावरे यांनी आपल्या अथक परिश्रम, अपार प्रेम आणि समाजाभिमुख दृष्टीकोनातून विशेष गरज असलेल्या मुलांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण केला आहे. संस्थेतील मतिमंद विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करत शिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या मानसिक व शारीरिक विकासाला चालना दिली. विशेष मुलांविषयी समाजात असलेल्या गैरसमजुती दूर करण्यासाठी त्यांनी सातत्याने समाजजागृतीचे कार्य केले असून पालकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे.

“शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नसून जीवन जगण्याची कला आहे,” हा विचार त्यांनी आपल्या कार्यातून प्रत्यक्षात साकारला आहे. आनंद झावरे यांचे कार्य शाळेपुरते मर्यादित नसून ते एक व्यापक सामाजिक चळवळ ठरले आहे. स्वतःचा वेळ, श्रम आणि मन या कार्यासाठी अर्पण करत त्यांनी अनेक कुटुंबांना नवी दिशा दिली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना ‘समाजरत्न २०२५’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

या सन्मानाबद्दल खासदार निलेश लंके, ग्रामीण अपंग कल्याण केंद्राचे संचालक रावसाहेब झावरे, निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सरपंच बाळासाहेब खिलारी, टाकळी ढोकेश्वर आदर्श गाव योजनेचे महेश पाटील, भाऊसाहेब झावरे सर, माजी सरपंच सुनीता झावरे, आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठान, पत्रकार वसंत रांधवण तसेच टाकळी ढोकेश्वर ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!