राहुरी प्रतिनिधी (सोमनाथ वाघ ) : पोलीस पाटील दिनानिमित्त राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने राहुरी तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांचा सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला. वेगवेगळ्या कायदा व सुव्यवस्था प्रसंगी, न उघडलेल्या गुन्ह्यांच्या तपासात, गावपातळीवरील वाद-विवाद शांततेत मिटविण्यात तसेच मागील लोकसभा व विधानसभा निवडणुका निष्पक्ष व शांततेत पार पाडण्यात पोलीस पाटलांनी मोलाची भूमिका बजावली आहे. तसेच ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत राहुरी पोलिसांनी शोधलेल्या ९८ मुलींच्या शोधातही पोलीस पाटलांचे योगदान उल्लेखनीय ठरले आहे.
या योगदानाबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. जयदत्त भवर यांच्या प्रमुख उपस्थितीत राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांच्या हस्ते सर्व पोलीस पाटलांना प्रमाणपत्र व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. जयदत्त भाऊसाहेब भवर यांनी, १९६७ पासून पोलीस पाटील पद परीक्षा घेऊन भरले जात असल्याने या पदासाठी कस लागतो, असे सांगितले. पोलीस पाटील हे ‘सिव्हिल कपड्यातील पोलीस’ असल्याने त्यांनी शंभर टक्के निष्पक्षपणे काम करावे, असे आवाहन करून सर्वांना पोलीस पाटील दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तालुक्यात मोटारसायकल चोरी व वाहन चोरीच्या घटनांमध्ये झालेली लक्षणीय घट अधोरेखित करत ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत मुलींच्या शोधात पोलीस पाटलांचा महत्त्वाचा वाटा असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ, पोलीस हवालदार तुळशीदास गीते, अशोक शिंदे, अजिनाथ पाखरे तसेच पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष हिराबाई सुधाकर नरोडे, सदाशिव पाराजी तागड, किरण गंगाधर उदावंत, संजीव शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब पवार पाटील (पोलीस पाटील, खुरसडगाव) यांनी केले, तर आभार संजीव शिंदे यांनी मानले.
यानंतर पोलीस पाटील संघटना, राहुरी तालुका यांच्या वतीने स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे पोलीस व पोलीस पाटील यांच्यातील संबंध अधिक दृढ झाले. सदर कार्यक्रम उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात पार पडला. तालुक्यातील सर्व पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राहुरी पोलीस स्टेशनच्यावतीने पोलीस पाटील दिनानिमित्त तालुक्यातील पोलीस पाटलांचा सन्मान

0Share
Leave a reply












