प्रतिनिधी / मोहन शेगर : शनी शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी त्यांच्या निवासस्थानी शनी शिंगणापूर परिसरात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागिल काही दिवसांपासून शनी शिंगणापूर संस्थान विविध मुद्यांमुळे चर्चेत आहेत. महिनाभरापूर्वी 114 मुस्लिम कर्मचारी घेतल्यामुळे संस्थानच्या विश्वस्त मंडळावर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना काढण्यात आले होते. त्यानंतर देवस्थानचे बनावट अॅप्स तयार करून पैशांची अफरातफर केल्याचा आरोप देखील झाला होता. या प्रकरणात सध्या चौकशी सुरु होती.
वास्तविक नितीन शेटे यांनी आत्महत्या का केली? या बाबत अद्याप खुलासा झालेला नाही. मात्र, विश्वस्त मंडळाने केलेल्या अनियमिततेबाबत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु असतानाच शेटे यांनी आत्महत्या केल्याने या अपहाराशी याचा संबंध आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
शनी शिंगणापूर देवस्थानाचे बनावट अॅप्स तयार करून पैशांची अफरातफर केल्याप्रकरणी सायबर खात्याच्या पोलिस उपमहानिरीक्षकांच्या देखरेखीखाली चौकशी आणि कारवाई करण्यात येत आहे.
या प्रकरणी शिर्डी आणि पंढरपूरच्या धर्तीवर शनि शिंगणापूर देवस्थानात मंदीर समिती स्थापन करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी विधानसभेत दिली होती. यासाठी कायदा करण्याची सरकारची तयारी असल्याचेही ते म्हणाले होते. या देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने कारभारात केलेल्या अनियमिततेबाबत एफआयआर दाखल करायचे आदेश दिल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. आमदार विठ्ठल लंघे यांनी याविषयी अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित केली होती.
Leave a reply













