SR 24 NEWS

इतर

छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीची विटंबना, यवतमध्ये संतापाची लाट, गाव बंद ठेवत ग्रामस्थांनी पाळला कडकडीत बंद

Spread the love

दौंड प्रतिनिधी / नितीन पाटुळे : दौंड तालुक्यातील यवत स्टेशन रोडवरील निळकंठेश्वर मंदिर परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना रात्री उशिरा एका युवकाने केली आहे. सकाळी पूजेला आल्यानंतर पुजाऱ्याला ही माहिती मिळाली सदर माहिती वाऱ्याप्रमाणे संपूर्ण गावात पसरली. या घटनेने संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली असून, रविवारी सकाळपासून यवत गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब दडस यांच्यासह यवत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि पंचनामा केला. सकाळी गावकऱ्यांना ही माहिती मिळाल्यानंतर स्थानिक व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तपणे आपले व्यवसाय बंद ठेवले. गावातील विविध हिंदू संघटना, तसेच इतर समाजघटकांनी यवत पोलीस ठाण्यावर मोर्चा नेऊन आरोपीस तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

उपविभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब दडस यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन करताना सांगितले की, आरोपीचा शोध घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला असून, जातीय सलोखा कायम राखण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी संयम बाळगावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

या घटनेचा निषेध करण्यासाठी हिंदू-मुस्लीम आणि इतर समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. निषेध सभेत अनेक वक्त्यांनी अशा प्रकारच्या घटना समाजात तेढ निर्माण करणाऱ्या असून त्याला चाप लावण्यासाठी कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

सभेच्या अखेरीस, “जोपर्यंत आरोपीला अटक होऊन कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत शिवाजी महाराजांची मूर्ती पुन्हा स्थापन केली जाणार नाही,” अशी शपथ उपस्थित नागरिकांनी घेतली. आरोपी अजून फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!