राहुरी प्रतिनिधी (सोमनाथ वाघ) : पत्नीला अमानुषपणे मारहाण करून तिचा मृत्यू घडवून आणल्याप्रकरणी पती व त्याच्या जावेला दोषी ठरवत जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने प्रत्येकी दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. हा गुन्हा खून नसून सदोष मनुष्यवध असल्याचा निष्कर्ष नोंदवत न्यायालयाने भारतीय दंड विधानाच्या कलम ३०४ अन्वये शिक्षा ठोठावली. या प्रकरणातील आरोपी प्रदीप विठ्ठल गाडे (वय ४२) व बुट्टी उर्फ अलका संदीप गाडे (वय ३५, रा. मोमीन आखाडा, ता. राहुरी) यांना जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश केदार एस. कुलकर्णी यांनी दोषी ठरविले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. अर्जुन बी. पवार यांनी प्रभावी युक्तिवाद केला.
फिर्यादी गिताराम जयवंत शेटे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीप्रमाणे, त्यांची मुलगी ज्योती प्रदीप गाडे हिचा विवाह १ मे २००७ रोजी आरोपी प्रदीप गाडे याच्याशी झाला होता. दाम्पत्यास ऋतूजा (वय ९) व सार्थक (वय ८) ही दोन मुले होती. ऋतूजा ही आजोबांकडे राहत होती, तर सार्थक आई-वडिलांसोबत राहत होता.
आरोपी प्रदीप गाडे व त्याची भावजयी बुट्टी उर्फ अलका यांच्यात अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून प्रदीप हा मद्यप्राशन करून पत्नी ज्योतीला वारंवार मारहाण करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. दि. ७ फेब्रुवारी २०१९ रोजी आरोपीचा मित्र विजय गाडे याने फिर्यादीस फोन करून ज्योतीने विषारी औषध प्राशन केल्याची माहिती दिली. त्यानंतर तिला नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल व पुढे मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दि. ८ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ६.५० वाजता तिचा मृत्यू झाला.
अंत्यविधीनंतर मयत ज्योतीचा मुलगा सार्थक याने दिलेल्या साक्षीत धक्कादायक माहिती उघड केली. रात्री सुमारे १० वाजता वडील घरी आल्यानंतर काकी बुट्टी हिने किरकोळ कारणावरून तक्रार केल्याने दोन्ही आरोपींनी ज्योतीला पोटावर व छातीवर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचे त्याने सांगितले. या मारहाणीतच तिचा मृत्यू झाल्याचे साक्षीतून स्पष्ट झाले.या खटल्यात सरकार पक्षाने एकूण १० साक्षीदार तपासले, तर आरोपी पक्षातर्फे एक साक्षीदार तपासण्यात आला. वैद्यकीय पुरावे, प्रत्यक्षदर्शी साक्ष तसेच अन्य कागदोपत्री पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने हा गुन्हा खून नसून सदोष मनुष्यवध असल्याचा निष्कर्ष नोंदविला. त्यामुळे भा.दं.वि. कलम ३०२ अंतर्गत दोषमुक्त करत, कलम ३०४ अन्वये दोन्ही आरोपींना प्रत्येकी दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली.
या प्रकरणात पैरवी अधिकारी महिला पोलीस कॉन्स्टेबल यशांजली जपकर व सीमा राजपूत यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.
मोमीन आखाडा येथील विवाहितेच्या सदोष मनुष्यवध प्रकरणी पती व जावेला १० वर्षे सक्तमजुरी

0Share
Leave a reply












