SR 24 NEWS

क्राईम

“तू मला आवडतेस” म्हणत साडीचा पदर ओढत ३३ वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग राहुरी पोलिसांत विनयभंग व धमकीप्रकरणी गुन्हा दाखल

Spread the love

राहुरी  प्रतिनिधी  (ज्ञानेश्वर सुरशे) : राहुरी तालुक्यातील वरशिंदे  परिसरातील एका ३३ वर्षीय विवाहित महिलेचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी भाऊसाहेब आनंदा वाबळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या  विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. ८ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिला आपल्या घरासमोरून जात असताना आरोपी भाऊसाहेब वाबळे हा दारूच्या नशेत तेथे आला. त्याने “तू मला खूप आवडतेस” असे म्हणत महिलेचा पाठलाग सुरू केला. यावेळी महिलेने त्याला विरोध करत पतीकडे तक्रार करीन, अशी तंबी दिली असता आरोपीने लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत तिच्या साडीचा पदर ओढला.

या प्रकाराने घाबरलेल्या महिलेने आरडाओरडा केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, काही वेळाने फिर्यादी महिला व तिच्या पतीने आरोपीला जाब विचारला असता, त्याने “तुम्हाला काय करायचे ते करा, मी तुला सोडणार नाही,” अशी धमकी देत अश्लील शिवीगाळ व दमदाटी केली.

या प्रकरणी  महिलेच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७८, ३५१(२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल रामनाथ सानप पुढील तपास करत आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!