तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या सक्षम मानल्या जाणाऱ्या अणदूर पंचायत समिती गणात ग्रामस्थांनी भरघोस मतदान करत पहिल्याच निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवून दिल्याबद्दल गावकऱ्यांचे आभार मानत, त्यांच्या विश्वासाला कधीही तडा लागू देणार नसल्याची ग्वाही नवनिर्वाचित सदस्य तथा भावी सभापती रणवीर सुनील चव्हाण यांनी दिली आहे.
पहिल्याच निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून येण्याचा विक्रम झाल्याने ही जबाबदारी अधिक वाढली असून, पुढील काळात विकासात्मक धोरण राबवत विविध शासकीय योजना तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अणदूर हे गाव शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक व राजकीयदृष्ट्या परिपक्व असून समृद्ध ऐतिहासिक परंपरेचा वारसा लाभलेले आहे. शिक्षण महर्षी स्व. सी. ना. आलूरे गुरुजी आणि सहकार महर्षी मधुकरराव चव्हाण साहेब यांनी राज्यपातळीवर केलेल्या कार्यामुळे गावाच्या नावलौकिकात मोठी भर पडली आहे. त्यांनी नेहमीच विकासाचा अजेंडा केंद्रस्थानी ठेवून काम केले असून, त्याच आदर्शांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार रणवीर चव्हाण यांनी व्यक्त केला.
अणदूरकरांची तालुक्याच्या राजकारणात स्वतंत्र ओळख असून विविध पक्षांचे, संघटनांचे नेते व कार्यकर्ते गावात कार्यरत आहेत. मात्र गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यामुळेच अणदूरची प्रगती शक्य झाली असल्याचे सांगत, जात-पात व राजकारण विरहित विकासकामांद्वारे वेगळा आदर्श निर्माण करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या यशात ज्येष्ठ व श्रेष्ठ मार्गदर्शकांसह युवकांचा मोठा वाटा असल्याचे नमूद करत, अक्षय करपे, सुधीर सिंग ठाकूर, अजिंक्य चव्हाण, सुदर्शन मोकाशे, शिवराज कापसे, दीपक मोकाशे, गजानन मोकाशे, रोहित शेळके, विशाल घुगे, ज्ञानेश्वर गायकवाड, करबसप्पा धमूरे, वैभव हगलगुंडे, आनंद राजे पाटील, राजकुमार गाढवे, महाळपा गळाकाटे, अभिजीत मोकाशे, अनिकेत पाटील, प्रवीण मुळे, महेश आपटे, सागर लंगडे यांच्यासह असंख्य युवकांचे भक्कम पाठबळ लाभल्याचे रणवीर चव्हाण यांनी सांगितले.
Leave a reply













