SR 24 NEWS

इतर

राहुरीत हेल्मेट सक्ती मोहिमेची धडाकेबाज सुरुवात; दुसऱ्याच दिवशी १०० दुचाकीस्वारांवर कारवाई, प्राणांतिक अपघातांची मालिका थांबवण्यासाठी राहुरी पोलिसांची विशेष मोहीम

Spread the love

राहुरी प्रतिनिधी : राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत वाढत्या प्राणांतिक अपघातांच्या पार्श्वभूमीवर हेल्मेट सक्ती मोहीम राबविण्यात येत असून, कारवाईच्या दुसऱ्याच दिवशी १०० हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच रॉंग साईटने वाहन चालविणाऱ्या पाच वाहनधारकांवरही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, सन २०२४ मध्ये ५७ तर सन २०२५ मध्ये ५८ प्राणांतिक अपघात राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत घडले असून, गेल्या दोन वर्षांत सुमारे ११५ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतांश जण दुचाकीस्वार असून त्यांनी हेल्मेटचा वापर केलेला नव्हता, असे निदर्शनास आले आहे.

या पार्श्वभूमीवर अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी दिनांक १० फेब्रुवारी २०२६ पासून राहुरी पोलीस स्टेशनच्या वाहतूक शाखेमार्फत विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. दिनांक ११ फेब्रुवारी रोजी कारवाईच्या दुसऱ्या दिवशी हेल्मेट न वापरणाऱ्या १०० दुचाकीस्वारांकडून एकूण १,००,००० रुपये (एक लाख) दंड वसूल करण्यात आला. तसेच रॉंग साईटने वाहन चालविणाऱ्या पाच वाहनधारकांकडून ९,००० रुपये दंड आकारण्यात आला. अशा प्रकारे एका दिवसात एकूण १,०९,००० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
ही मोहीम पुढेही नियमितपणे सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नगर–मनमाड महामार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्व दुचाकीस्वारांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी हेल्मेटचा अनिवार्य वापर करावा, असे आवाहन राहुरी पोलिसांकडून करण्यात आले आहे.

ही कारवाई मा. सोमनाथ घारगे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा. सोमनाथ वाकचौरे, अप्पर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, तसेच मा. जयदत्त भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे (राहुरी पोलीस स्टेशन) यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार भाऊसाहेब आव्हाड, पोलीस हवालदार संतोष ठोंबरे, रमेश दरेकर व बापू फुलमाळी यांनी ही कारवाई पार पाडली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!