नांदेड प्रतिनिधी /धम्मदिप भद्रे : मराठवाड्यातील रेल्वे विकासाला गती देण्याच्या दृष्टीने आणि रेल्वे प्रश्न मार्गी लावण्याचे अनुषंगाने खा. डॉ. अजित गोपछडे यांनी आज केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्लीत भेट घेतली. नांदेड रेल्वे विभागांतर्गत असलेले रेल्वेच्या अनेक मागण्यांचे निवेदन खा. डॉ . गोपछडे यांनी रेल्वेमंत्र्यांना दिले. या सर्व मागण्या मान्य कण्यासाठी आपण सकारात्मक प्रयत्न करू असा विश्वास केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी दिला आहे.
वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक सुधारित करण्यात यावे , धर्माबाद रेल्वे स्थानकाचे नामकरण करण्यात यावे अशी मागणी ही खा. डॉ. गोपछडे यांनी यावेळी केली.नांदेड–मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक चुकीचे असल्याने प्रवाशांना योग्य सुविधा मिळत नाहीत. शिवाय रेल्वेचा वेग कमी असल्याने अधिकचा वेळ प्रवासात खर्च होत आहे. परिणामी प्रवाशांचा वेळ वाया जातो. मुंबईतील कामे करून परतण्यासाठी योग्य नियोजन होत नाही. ही बाब खा. डॉ .गोपछडे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे वंदे भारतच्या वेळापत्रकात बदल करण्याची आवश्यकता असल्याचेही खा. डॉ .गोपछडे यांनी यावेळी रेल्वेमंत्र्यांना सांगितले. वंदे भारतचा प्रवाशांना योग्य लाभ व्हावा यासाठी नांदेड येथून रेल्वे प्रस्थान वेळ पहाटे ५:०० ऐवजी ५:३० वाजता करावी आणि सुधारित वेळापत्रकानुसार मुंबईत दुपारी सुमारे १:०० वाजेपर्यंत सुनिश्चित करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
उमरी रेल्वे स्थानकावर नरसापूर–नगरसोलसह चार महत्त्वाच्या गाड्यांना थांबा देण्याची मागणी करताना संत दासगणू महाराजांच्या समाधीस्थळाच्या निकटतेचा उल्लेख करण्यात आला. भाविक व प्रवाशांच्या सोयीसाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.याचबरोबर गोरठा गेट अंडरब्रिज क्र. १६४ ची जीर्ण अवस्था लक्षात घेता त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची गरजही अधोरेखित करण्यात आली.गेल्या दशकभरात धर्माबाद स्थानकावर कोणत्याही नव्या एक्सप्रेस किंवा सुपरफास्ट गाडीला थांबा मंजूर झालेला नाही, याकडे लक्ष वेधण्यात आले. प्रादेशिक समतोल विकासाच्या दृष्टीने रामेश्वरम्–ओखा, नांदेड–संबलपूर, नांदेड–विशाखापट्टणम तसेच हैदराबाद–जयपूर या प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी करण्यात आली.
नांदेड रेल्वे विभागात विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतरही मेमू कारशेडचा अभाव असल्याकडे लक्ष वेधून स्थानिक अनुरक्षण सुविधा उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. भविष्यातील औद्योगिक विस्तार व वाढत्या मालवाहतुकीचा विचार करता पूर्ण विकसित इलेक्ट्रिक लोकोशेडची स्थापना ही काळाची गरज असल्याचे खा. डॉ . गोपछडे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
या सर्व प्रस्तावांना मान्यता मिळाल्यास नांदेड रेल्वे विभागाला नवी गती प्राप्त होईल व मराठवाड्याच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीस ठोस अधिष्ठान मिळेल. असा विश्वास डॉ. अजित गोपछडे यांनी व्यक्त केला. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सर्व विषयांवर गांभीर्याने विचार करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. ही भेट नांदेड परिसरातील रेल्वे विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण व निर्णायक पाऊल ठरेल अशी माहिती खा. डॉ. गोपछडे यांनी दिली.
धर्माबाद रेल्वे स्थानकाचे नामकरण “प.पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार रेल्वे स्थानक” असे करण्यात यावे अशी मागणी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली. धर्माबाद जवळ राष्ट्रीय चेतनेचे केंद्र असलेले कंदकुर्ती हे डॉ. हेडगेवार यांचे मूळ गाव असल्यामुळे त्यास राष्ट्रीय महत्त्व प्राप्त आहे. असेही डॉ. गोपछडे यांनी स्पष्ट केले. या नामकरणामुळे ऐतिहासिक गौरवाबरोबरच बासर – कंदकुर्ती संयुक्त धार्मिक पर्यटन व स्थानिक विकासालाही चालना मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नांवर केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी खा. डॉ. अजित गोपछडेंची सकारात्मक चर्चा, वंदे भारत वेळापत्रक सुधारणेसह धर्माबाद स्थानकाच्या नामकरणाची केली मागणी

0Share
Leave a reply












