राहुरी प्रतिनिधी (सोमनाथ वाघ) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मानोरी येथील विद्यार्थ्यांनी केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे. हस्ताक्षर, वक्तृत्व, वेशभूषा, गायन तसेच सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत पारितोषिके पटकावली. हस्ताक्षर स्पर्धेत किलबिल गटातील आरोही सतीश आढाव हिने प्रथम क्रमांक मिळवला, तर बालगटातील श्रावणी सुभाष कांबळे हिने द्वितीय क्रमांक पटकावत यश संपादन केले.
वक्तृत्व स्पर्धेत किलबिल गटातील अक्षदा सुरेश आढाव हिने द्वितीय क्रमांक मिळवला, वेशभूषा सादरीकरण स्पर्धेत किलबिल गटातील सिराज सलीम पठाण याने तृतीय क्रमांक मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले, वैयक्तिक गीत गायन स्पर्धेत किलबिल गटातील स्वरा राजेंद्र मकासरे हिने तृतीय क्रमांक पटकावला, तर बालगटातील समर्थ अमोल भिंगारे यानेही तृतीय क्रमांक मिळवत शाळेच्या यशात भर घातली. याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रम (लहानगट) स्पर्धेतही शाळेला तृतीय क्रमांक मिळाला.
या घवघवीत यशाबद्दल सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक आणि पालकवर्गाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेमार्फत सातत्याने राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांचे हे यशस्वी फलित असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
Leave a reply












