राहुरी प्रतिनिधी (ज्ञानेश्वर सुरशे) : राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा परिसरात अवैध दारू विक्री करणाऱ्या एका इसमावर राहुरी पोलीस ठाणे पथकाने छापा टाकत कारवाई केली. या कारवाईत विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास गोटुंबे आखाडा परिसरातील झुडपांच्या आडोशाला अवैध दारू विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी छापा टाकला.
या कारवाईदरम्यान महेश प्रकाश पटारे (वय ३६, रा. ब्राम्हणी, ता. राहुरी) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ‘संत्रा’ कंपनीच्या १८० मि.ली. क्षमतेच्या १२ सीलबंद बाटल्या (अंदाजे किंमत ९६० रुपये) जप्त करण्यात आल्या. आरोपी हा विनापरवाना बेकायदेशीररीत्या दारू विक्रीच्या उद्देशाने साठा बाळगून असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी राहुरी पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अर्जुन दारकुंडे पुढील तपास करत आहेत.
Leave a reply













