SR 24 NEWS

राजकीय

नांदेड–देगलूर ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्गाला गती : जोडमार्गासह प्रकल्प मार्गस्थ, नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या पाठपुराव्याला यश

Spread the love

नांदेड–देगलूर ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्गाला गती : जोडमार्गासह प्रकल्प मार्गस्थ, नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या पाठपुराव्याला यश

नांदेड, दि. 19 फेब्रुवारी : इंदोर–अकोला–नांदेड–हैदराबाद या महत्त्वपूर्ण द्रुतगती महामार्ग साखळीतील नांदेड–देगलूर ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्ग प्रकल्पाला निर्णायक गती मिळाली असून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मार्फत एल. एन. मालवीय इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला प्रदान करण्यात आले आहे. यासाठी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यशस्वी पाठपुरावा केला आहे.

प्रस्तावित नांदेड–देगलूर ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्ग हा जालना–नांदेड द्रुतगती मार्गाशी जोडणाऱ्या स्वतंत्र जोडमार्गासह विकसित करण्यात येणार असून मराठवाडा तसेच सीमाभागातील दळणवळण सुलभ होण्याबरोबरच औद्योगिक गुंतवणूक, व्यापारवृद्धी आणि प्रादेशिक विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. विशेषतः नांदेड जिल्ह्यातील देगलूर, मुखेड, भोकर तसेच सीमावर्ती ग्रामीण भागांना मोठ्या शहरांशी थेट व जलद संपर्क मिळणार असल्याने कृषी उत्पादनांची बाजारपेठ वाढणे, लघुउद्योग व सेवा व्यवसायांना संधी मिळणे, पर्यटन आणि शैक्षणिक हालचाली सुलभ होणे तसेच रोजगारनिर्मितीला चालना मिळणे असे बहुआयामी लाभ या प्रकल्पातून अपेक्षित आहेत.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. विविध टप्प्यांवर निवेदने सादर करणे, प्रत्यक्ष भेटी घेणे तसेच प्रकल्पाच्या तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रियेबाबत पाठपुरावा करणे अशा माध्यमांतून त्यांनी हा विषय केंद्र व राज्य शासनाच्या पातळीवर प्रभावीपणे मांडला होता. त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळत सविस्तर प्रकल्प अहवाल प्रक्रियेला प्रारंभ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

नांदेड–देगलूर द्रुतगती ग्रीनफिल्ड महामार्ग साकार झाल्यानंतर इंदोर–अकोला–नांदेड–हैदराबाद या महामार्ग साखळीला बळकटी मिळणार असून प्रवासाचा कालावधी कमी होणे, मालवाहतूक सुलभ होणे आणि सीमाभागातील सामाजिक-आर्थिक विकासाला नवे आयाम मिळणे अपेक्षित असल्याचे मत व्यक्त करत खा. डॉ. अजित गोपछडे यांनी नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!