तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : धाराशिव जिल्ह्यात अत्यंत अटीतटीची व प्रतिष्ठेची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अणदूर जिल्हा परिषद गटात उबाठा गटाने मोठा विजय मिळवत महायुतीला धक्का दिला आहे. महायुतीचे उमेदवार दीपक दादा आलूरे यांचा पराभव करत उबाठा गटाचे उमेदवार डॉ. जितेंद्र कानडे यांनी 297 मतांची आघाडी घेत विजयश्री खेचून आणली.
दरम्यान, पंचायत समितीच्या निवडणुकीत मात्र महायुतीला दिलासा मिळाला. पंचायत समिती गणातून रणवीर चव्हाण यांनी 2620 मतांच्या भरघोस आघाडीने मनसेचे उमेदवार बसवराज घुगरे यांचा पराभव केला. तसेच चिवरी गणातून प्रवीण भोसले यांनी 393 मतांच्या फरकाने संजय भोसले यांना मात दिली. त्यामुळे अणदूर गटात महायुतीचा गड आला असला तरी जिल्हा परिषद गटात सिंह गेला, अशी अवस्था पहायला मिळाली.
संपूर्ण जिल्ह्यात प्रतिष्ठेची व अस्तित्वाची लढाई म्हणून गाजलेल्या अणदूर जिल्हा परिषद गटात महायुतीतील अंतर्गत गटबाजी, मनभेद व कलहाचा फटका थेट उमेदवार तथा माजी सभापती दीपक दादा आलूरे यांना बसल्याचे स्पष्ट झाले आहे. हे वास्तव नाकारता येणार नाही.
निवडणुकीपूर्वीच महायुतीत निर्माण झालेल्या अंतर्गत संघर्षामुळे मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंग झाल्याची चर्चा असून, त्यामुळे सहज जिंकता येण्याजोगी निवडणूक महायुतीच्या हातातून निसटून उबाठा गटाच्या पदरात पडल्याचा बोलबाला राजकीय वर्तुळात सुरू आहे. खर्च न करता उबाठा गटाला मिळालेला हा विजय महायुतीसाठी आत्मपरीक्षणाचा विषय ठरत आहे.
Leave a reply













