राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी शहराच्या मुख्य बाजारपेठेत रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी प्रसिद्ध वर्धमान ज्वेलर्स या सराफ दुकानावर धाडसी चोरी केली. या घटनेत लाखो रुपयांची चांदी लंपास करण्यात आली असून, शहरात एकच खळबळ उडाली आहे.विद्यामंदिर शाळा परिसरात, रस्त्यालगत भरवस्तीत असलेले हे दुकान राजेंद्र भन्साळी यांचे आहे. सोमवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी ते आले असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले. स्थानिक नागरिकांनीही दुकानातील उघडझाप पाहून भन्साळी यांना तातडीने माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात स्पष्ट झाले की चोरट्यांनी दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर स्प्रे मारून ते निष्क्रिय केले होते. विशेष बाब म्हणजे, दुकानाच्या शटरचे कुलूप न तोडता फक्त कोंडा फोडून आत प्रवेश करण्यात आला. त्यानंतर काउंटर तोडून चांदीचे दागिने चोरले गेले.
दुकानाचे मालक राजेंद्र भन्साळी व त्यांचे पुत्र गौरव आणि सौरभ यांनी चोरी झालेल्या मालाची पाहणी केली. चोरीची नेमकी रक्कम अद्याप समोर आलेली नसली तरी लाखोंचा ऐवज चोरीला गेला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.घटनेनंतर परिसरातील सराफ व्यावसायिकांसह नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले. भर बाजारपेठेत, अशा प्रकारे सुरक्षेच्या उपाययोजना डावलून चोरी होणे ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राहुरी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून, लवकरच चोरांचा माग काढला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. चोरीचा संपूर्ण तपशील व नेमकी रक्कम लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
राहुरीत मध्यरात्री सराफ दुकान फोडले; लाखोंच्या चांदीच्या दागिन्यांची चोरी, शहरात खळबळ

0Share
Leave a reply













