राहुरी (प्रतिनिधी) – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील कापूस सुधार प्रकल्पात कृषि सहाय्यक पदावर कार्यरत असलेले कै. पांडुरंग तुकाराम कुसळकर (वय ५५) यांचे ०४ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. ०४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ते नेहमीप्रमाणे आपल्या कापूस सुधार प्रकल्प कार्यालयात उपस्थित झाल्यानंतर साडेदहा ते अकराच्या सुमारास कार्यलयातच त्यांना अचानक अस्वस्थ वाटल्याने कार्यलयातील सहकाऱ्यांनी त्यांना तात्काळ राहुरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तेथील डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीनंतर त्यांना अहिल्यानगर येथे हलविण्यास सांगितले त्यांना अहिल्यानगर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र उपचार सुरू असतानाच त्यांना दुसरा हृदयविकाराचा झटका आल्याने त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
कै. कुसळकर यांनी आपल्या निष्ठावान व प्रामाणिक सेवेतून कापूस सुधार प्रकल्पातील संशोधन आणि विकास उपक्रमांना मोठा हातभार लावला. त्यांची सहकार्यशील वृत्ती, मनमिळावूपणा आणि कामावरील निष्ठा यामुळे ते सहकाऱ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते. तसेच त्यांनी विद्यापीठातील वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांसाठी 12/ 24 आश्वासित प्रगती योजना मिळवून देण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा करून व विद्यापीठातील प्रशासनाशी समन्वय साधून कर्मचाऱ्यांना जिव्हाळ्याची 12/ 24 आश्वासित प्रगत योजना लागू करण्यासाठी त्यांचा मोठा हातभार होता.
त्यांच्या अचानक निधनाने विद्यापीठात शोककळा पसरली असून, कापुस सुधार प्रकल्प व विद्यापीठातील इतर विभागातील अधिकारी व सहकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्याचे स्मरण करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. कै. कुसळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या पार्थिवावर ५ ऑगस्ट रोजी त्यांच्या मूळगावी सोनई येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कृषि सहाय्यक कै.पांडुरंग कुसळकर यांचे यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन, महात्मा फुले कृषी विद्यापीठात पसरली शोककळा

0Share
Leave a reply












