सोमनाथ वाघ / मानोरी (ता. राहुरी) : मानोरी शिवारातील उसाच्या शेतात मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास बिबट्या आढळून आल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेषतः शेतवस्तीतील नागरिक भयभीत झाले असून, मागील आठवड्यात एका शेतकऱ्याची गाय बिबट्याने फस्त केली होती नागरिकांनी वनविभागास गेल्या 15 दिवसापासून नागरिकांनी तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली असता वन विभाग अजुनही बघ्याची भूमिका घेत असून पिंजरे लावण्याची मागणीने जोर धरला आहे.
माजी उपसरपंच शिवाजी थोरात यांच्या वस्तीवर असणाऱ्या जनावरांच्या शेडजवळ बिबट्या आढळून आला. त्यावेळी थोरात यांनी शेजारील नागरिकांना सूचना दिली. नागरिकांनी ऊसाच्या शेतीकडे धाव घेतली असता, बिबट्याचे ठसे आढळून आले. हा प्रकार घडताच गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मानोरी परिसरात बिबट्याचा वावर सतत सुरू आहे. पोटे वस्ती, पठाणवस्ती, भिंगारे वस्ती, देवकाते वस्ती, खिळे वस्ती, गणपतवाडी परिसरात बिबट्याने पाळीव कुत्र्यांवर हल्ले करून अनेक कुत्र्यांना जखमी केलं आहे. सहा ते सात महिन्यांपूर्वी एका शेतकऱ्यावर भर दिवसा बिबट्याने हल्ला केला होता. तर आठवडाभरापूर्वी शेतकरी पवार यांची गावरान गाय बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली होती.
मंगळवारी घडलेला प्रकार म्हणजे बिबट्याचा वावर अजूनही कायम असल्याचेच निदर्शनास आले आहे. शेतकरी आणि ग्रामस्थ आता भीतीच्या सावटाखाली असून, वनविभागाने तातडीने लक्ष घालून मानोरी परिसरात पिंजरा लावावा, अशी जोरदार मागणी नागरिक करत आहेत.
मानोरी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ; ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण, वनविभागास पिंजरा लावण्याची वारंवार मागणी करूनही वनविभागाचे दुर्लक्ष

0Share
Leave a reply












