SR 24 NEWS

इतर

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील प्रकल्पग्रस्त विशेष पदभरती प्रक्रिया रखडली ; १७ ऑगस्टपासून अन्नत्याग उपोषणाचा इशारा

Spread the love

राहुरी विद्यापीठ (प्रतिनिधी) – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे प्रकल्पग्रस्तांसाठी जाहीर झालेली विशेष पदभरती प्रक्रिया आठ महिने उलटूनही पूर्ण करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र नाराजी असून, दि. १७ ऑगस्ट २०२५ पासून विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर अन्नत्याग उपोषण करण्याचा इशारा प्रकल्पग्रस्त कृती समितीने दिला आहे.

शासनाने दि. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी विद्यापीठातील उर्वरित प्रकल्पग्रस्तांसाठी विशेष पदभरती प्रक्रियेचा शासन निर्णय निर्गमित केला होता. त्यानुसार विद्यापीठाने दि. ३१ डिसेंबर २०२४ रोजी पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली. मात्र, त्यानंतर तब्बल आठ महिने उलटूनही विद्यापीठ स्तरावर कोणतीही लेखी परीक्षा न घेता प्रक्रिया थांबवलेली आहे.

दि. ३० जून २०२५ रोजी कृषीमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, ३१ जुलै २०२५ पर्यंत लेखी परीक्षा नसलेल्या गट-ड वर्गातील पदांची गुणवत्ता यादी तयार करून नियुक्त्या देण्याचा निर्णय झाला होता. तसेच उर्वरित गट-क व गट-ड पदांच्या परीक्षाही १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत घेण्याचे ठरले होते. परंतु प्रत्यक्षात या निर्णयांची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संभाव्य निवडणुकांचे पार्श्वभूमीवर भरती प्रक्रियेस अधिक विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही भरती तात्काळ पूर्ण व्हावी, अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. अन्यथा, १७ ऑगस्टपासून अन्नत्याग उपोषणाला बसण्याचा निर्धार कृती समितीने केला आहे.

“शासन स्तरावरून आदेशित असूनही विद्यापीठ प्रशासन प्रक्रिया राबवण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये तीव्र असंतोष आहे. उपोषणामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीची पूर्ण जबाबदारी विद्यापीठ प्रशासनाची असेल,” असा स्पष्ट इशारा कृती समितीने दिला आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!