अकोले प्रतिनिधी : अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने मोठी कारवाई करत अकोले तालुक्यातील कोतूळ येथे तब्बल 1 कोटी 1 लाख 74 हजार 750 रुपयांचा गुटखा साठा जप्त केला. रविवारी (दि. 13) रोजी केळी रस्त्यालगत असलेल्या एका शेडवर धाड टाकून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत शोएब शाविद काजी आणि शाहिद हुसेन लतीफ पटेल यांना गुटखा साठवणूक व विक्रीप्रकरणी अटक करण्यात आली असून, त्यांच्यासह आणखी १० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात गुटखा साठा, वाहने आणि रोख रक्कम असा एकूण 1 कोटी 1 लाख 74 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिस अधीक्षक घार्गे यांच्या आदेशाने स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकाचे नेतृत्व परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे करीत असून, त्यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही यशस्वी कारवाई केली. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या धडक कारवाईमुळे तालुक्यातील अवैध धंदे चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, गुटखा पुरवठा साखळीचा छडा लावण्यासाठी प्रयत्न तीव्र करण्यात आले आहेत.
अकोले तालुक्यातील कोतुळ येथे पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी पकडला एक कोटी रूपयांचा गुटखा

0Share
Leave a reply












