SR 24 NEWS

जनरल

शनिशिंगणापूर येथे बनावट अँपद्वारे फसवणूक करणाऱ्या 4 अ‍ॅप मालकांवर गुन्हा दाखल

Spread the love

सोनई प्रतिनिधी / मोहन शेगर : श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथे शनिदेवाची पूजा, अभिषेक व तेल अर्पण केला जाईल असा खोटा मजकूर फसवणुकीच्या उद्देशाने संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन प्रसारित केल्याप्रकरणी अहिल्यानगर सायबर शाखेच्या वतीने शिंगणापूर पोलीस ठाण्यात अज्ञात अ‍ॅपधारक, मालक व साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगरच्या सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकासाहेब काकडे (वय 32) यांनी शिंगणापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की सायबर शाखेकडे देवस्थानने केलेल्या अर्जाची चौकशी अधिकारी व त्यांचे पथकाने संशयित व संकेतस्थळांची तांत्रिक चौकशी केली असता घरमंदिर डॉट इन, ऑनलाईन प्रसाद डॉटकॉम, पूजा परिसेवा डॉट कॉम, हरिओम डॉट अ‍ॅप व ई पूजा डॉट कॉम या यूआरएल संकेतस्थळांचे धारक व मालक यांनी शनैश्वर देवस्थान व धर्मादाय आयुक्त यांची ऑनलाईन दर्शन पूजा अभिषेक व तेल चढावा बुकिंग करता कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी घेतलेली नाही व देवस्थानला कोणत्याही प्रकारची देणगी न देता संकेतस्थळ व अ‍ॅपधारक, मालक यांनी त्यांचे साथीदारासह श्री शनैश्वर मंदिर शनिशिंगणापूर येथील शनि महाराजांच्या शिळेचा फोटो, शनी मंदिराचा व महाद्वाराचा फोटो वापरला व संकेतस्थळ/अ‍ॅपचे धारक, मालक यांचे कोणतेही अधिकृत पुजारी शिंगणापूर येथे उपलब्ध नसताना देखील त्यांनी त्यांचे पुजारी मार्फत श्री शनैश्वर देवस्थान येथे शनि देवाची पूजा अभिषेक व तेल चढावा केला जाईल असा खोटा मजकूर फसवणुकीच्या उद्देशाने संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन प्रसारित केला आहे.

तसेच ऑनलाईन पद्धतीने भाविकांकडून अनियमित दराने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी रक्कम स्वीकारून शनैश्वर देवस्थान व भाविकांची फसवणूक केली आहे. याबाबत वरिष्ठांनी अर्जदार सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ भीमाशंकर दरंदले शनैश्वर देवस्थान व संस्थानचे कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ केरुजी दरंदले यांना वेळोवेळी संपर्क साधून संकेतस्थळ/अ‍ॅपधारक मालक व त्यांचे साथीदार यांच्यावर फिर्याद देण्यास कळवूनही त्यांनी फिर्याद न दिल्याने सदर प्रकरण संवेदनशील व भाविकांच्या भावनांशी संबंधित असल्याने भाविकांची व संस्थानची होणारी फसवणूक थांबण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशाने फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी शिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. 165/2025 भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 336(3), 3 (5) सह माहिती व तंत्र तंत्रज्ञान अधिनियम चे कलम 66-ड प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम हे करत आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!