राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी फॅक्टरी येथील डी पॉल इंग्रजी माध्यम शाळेतील इयत्ता दुसरीच्या विद्यार्थिनीने परिपाठानंतर थेट शाळेच्या मुख्य गेटमधून बाहेर पडून नगर-मनमाड महामार्ग ओलांडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना समजताच शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. ही विद्यार्थिनी परिपाठ झाल्यानंतर बिनधास्तपणे शाळेच्या गेटमधून बाहेर गेली आणि सुमारे दीड किलोमीटरचे अंतर चालत पार करत डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचली. दरम्यान, शहरातील मुख्य रस्त्यांवरून ती एकटीच चालत जात होती. मोठ्या प्रमाणात असलेल्या वाहतुकीत अपघात किंवा अन्य प्रकार टळल्याने सुदैवच म्हणावे लागेल.
या घटनेबाबत सर्वात चिंताजनक बाब म्हणजे शाळा प्रशासन व शिक्षकांना विद्यार्थिनी शाळेत आली की नाही, याची माहितीच नव्हती. पालकांनी चौकशी केली असता शाळेने उलट जबाबदारी टाळत, “तुमची मुलगी शाळेत आलीच नाही,” असा खुलासा केला. परिणामी पालकांनी संताप व्यक्त करत शाळेच्या व्यवस्थापनाला चांगलाच जाब विचारला. सदर मुलगी शाळेपासून एक ते दीड किलोमीटर अंतर पायी गेली. या दरम्यान काही अनिष्ट घटना घडली असती, तर त्याची जबाबदारी कोणाची? यावर पालक आणि नागरिक प्रश्न विचारत आहेत.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने मुलीच्या आजोबांना बोलावण्यात आले आणि मुलगी त्यांच्या ताब्यात देण्यात आली. त्यानंतर आजोबा आणि आजीने शाळेत जाऊन प्राचार्य व शिक्षकांना जाब विचारला. मात्र शाळेने जबाबदारी स्वीकारण्याऐवजी हात झटकत घुमजाव केला, ही बाब अधिकच गंभीर मानली जात आहे.या घटनेमुळे डी पॉल शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पालकांत प्रचंड अस्वस्थता आणि चिंता निर्माण झाली आहे. प्रशासनाने तातडीने याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी पालक आणि नागरिकांतून होत आहे.
राहुरी फॅक्टरीतील डी पॉल शाळेतील मुलगी शाळेच्या गेटमधून थेट रस्त्यावर, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर..

0Share
Leave a reply












