SR 24 NEWS

राजकीय

नमामि गंगेपाठोपाठ ‘ नमामि गोदावरी ’ साठी खा. डॉ. अजित गोपछडे राज्यसभेत आग्रही : श्रद्धा, शेती आणि संस्कृतीच्या जीवनदायिनीचे शुद्धीकरण व पुनरुज्जीवन आवश्यक

Spread the love

नांदेड प्रतिनिधी /धम्मदिप भद्रे : “दक्षिण गंगा” म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी ही केवळ जलप्रवाह नसून श्रद्धा, शेती आणि संस्कृतीची जीवनदायिनी आहे असे ठाम प्रतिपादन करीत खा. डॉ. अजित गोपछडे यांनी राज्यसभेत गोदावरी नदीच्या शुद्धीकरण व पुनरुज्जीवनासाठी नमामि गंगेच्या धर्तीवर ‘नमामि गोदावरी’ हा स्वतंत्र राष्ट्रीय कार्यक्रम सुरू करण्याची आग्रही मागणी केली.

राज्यसभेतील प्रश्नोत्तराच्या माध्यमातून डॉ. गोपछडे यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधत सांगितले की, गोदावरी नदीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि कृषी महत्त्व अपार आहे. मात्र वाढते प्रदूषण, पाण्याची ढासळलेली गुणवत्ता आणि धार्मिक स्नानस्थळांवर, नदीघाटावर होणारा परिणाम यामुळे या पवित्र नदीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेषतः नांदेड येथे स्थित तख्त सचखंड श्री हजूर साहिब या जागतिक श्रद्धास्थानाच्या पार्श्वभूमीवर गोदावरीचे शुद्धीकरण हे केवळ पर्यावरणीय नव्हे, तर राष्ट्रीय श्रद्धेचेही प्रश्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. श्रद्धा केंद्र असलेल्या विविध ठिकाणी भाविकांना स्नान करण्यायोग्य शुद्ध पाणी आणि योग्य सुविधा असाव्यात अश्या जन अपेक्षेसह खा. डॉ. गोपछडे यांनी गोदावरी नदीच्या संपूर्ण प्रवाहासाठी एकसंध, दीर्घकालीन आणि प्रभावी राष्ट्रीय धोरणाची आवश्यकता अधोरेखित करत, ‘नमामि गोदावरी’सारखा स्वतंत्र कार्यक्रम सुरू केल्यास नदी पुनरुज्जीवनाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

केंद्र सरकारकडून उत्तर देताना जलशक्ती राज्यमंत्री राजभूषण चौधरी यांनी गोदावरी नदीचे प्रचंड धार्मिक, सांस्कृतिक व कृषी महत्त्व मान्य केले. राष्ट्रीय नदी संवर्धन योजना अंतर्गत गोदावरीच्या प्रदूषण नियंत्रणासाठी महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात विविध सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

महाराष्ट्रात नांदेड येथे २६ एमएलडी, त्र्यंबकेश्वर येथे १ एमएलडी आणि नाशिक येथे १०० एमएलडी, तर तेलंगणात भद्राचलम, मंचेरियाल आणि रामागुंडम येथे तसेच आंध्र प्रदेशातील राजमहेंद्रवरम येथे सांडपाणी प्रक्रिया क्षमता निर्माण करण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले. तसेच गोदावरीसह सहा प्रमुख नद्यांच्या खोऱ्यांसाठी केस असेसमेंट अँड मॅनेजमेंट प्लॅन (CAMP) अंतर्गत समन्वित प्रयत्न सुरू असल्याचेही सांगण्यात आले.

तथापि, गोदावरीसाठी ‘नमामि गोदावरी’सारख्या स्वतंत्र राष्ट्रीय मोहिमेची गरज अधिक ठळकपणे पुढे येत असून, खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या आग्रही भूमिकेमुळे हा प्रश्न पुन्हा एकदा राष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. श्रद्धा, शेती आणि संस्कृतीची जीवनदायिनी असलेल्या गोदावरीचे शुद्धीकरण व पुनरुज्जीवन हे काळाची गरज असल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!