नांदेड प्रतिनिधी / धम्मदिप भद्रे : शहरातील आरोग्य सुविधा बळकट करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घडामोडी घडत असून, केंद्रीय सरकारी आरोग्य योजना (CGHS) अंतर्गत अॅलोपॅथिक वेलनेस सेंटला मंजुरी प्राप्त झाली आहे. अशी माहिती राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी दिली. यासोबतच, नांदेडमध्ये आयुष मंत्रालयाअंतर्गत केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद (CCRAS) चे स्वतंत्र अनुसंधान केंद्र स्थापन करण्याची ठोस मागणीही त्यांनी राज्यसभेत उपस्थित केली.
खा. डॉ. अजित गोपछडे यांनी दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ रोजी नांदेड, महाराष्ट्र येथे सी जी एच एस अॅलोपॅथिक वेलनेस सेंटर स्थापन करण्याबाबत केंद्र सरकारकडे सविस्तर निवेदन सादर केले होते. या पाठपुराव्याच्या अनुषंगाने नागपूर येथील सी जी एच एस कार्यालयाच्या पथकाने नांदेड येथील संभाव्य स्थळाची पाहणी करून सर्वेक्षण अहवाल केंद्र सरकारकडे पाठवला. दिनांक ३० जानेवारी २०२५ रोजी प्राप्त पत्रात अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाची मान्यता आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या नंतर पुन्हा पुन्हा पाठपुरावा करून आता सीजीएचएस वेलनेस सेंटरच्या मंजुरी मिळाली आहे.
मराठवाडा विभागातील प्रमुख प्रशासकीय, शैक्षणिक व आर्थिक केंद्र असलेल्या नांदेड शहरात रेल्वे, आयकर, टपाल, केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, सार्वजनिक क्षेत्रातील बँका तसेच विविध केंद्र सरकारी कार्यालये कार्यरत आहेत. त्यामुळे येथे मोठ्या संख्येने सेवारत व निवृत्त केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक आणि त्यांचे कुटुंबीय वास्तव्यास आहेत. मात्र सीजीएचएस वेलनेस सेंटर नसल्याने आजवर लाभार्थ्यांना वैद्यकीय सेवांसाठी छत्रपती संभाजीनगर किंवा हैदराबादसारख्या दूरच्या शहरांत जावे लागत होते. ज्येष्ठ नागरिक, पेन्शनधारक व नियमित उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना होत असलेली ही गैरसोय लक्षात घेऊन खा. डॉ. गोपछडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
दरम्यान, आधुनिक वैद्यकीय सुविधांबरोबरच पारंपरिक वैद्यक पद्धतींच्या संशोधनालाही चालना देण्याच्या दृष्टीने नांदेडमध्ये सीसीआरएएस चे अनुसंधान केंद्र स्थापन करण्यात यावे, अशी ठाम भूमिका खा. डॉ. अजित गोपछडे यांनी राज्यसभेत मांडली.आयुर्वेद व पारंपरिक उपचार पद्धतींवरील जनतेचा वाढता विश्वास, मराठवाड्यातील लोकसंख्या आणि संशोधन व उपचार सुविधांची गरज लक्षात घेता, नांदेड येथे असे केंद्र उभारणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. नांदेड हे प्रशासकीय, शैक्षणिक व आरोग्यसेवेचे महत्त्वाचे केंद्र असून, येथे CCRAS अनुसंधान केंद्र सुरू झाल्यास ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना आयुर्वेदिक उपचार, औषध संशोधन व मानकीकरणाच्या सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होतील.
यामुळे विद्यार्थ्यांना, संशोधकांना व रुग्णांना आधुनिक वैज्ञानिक पद्धतीने आयुर्वेदातील संशोधन व उपचारांचा लाभ मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सी जी एच एस अॕलोपॅथिक वेलनेस सेंटर ला प्राप्त झालेली मंजुरी आणि सी सी आर ए एस अनुसंधान केंद्राची मांडलेली मागणी यामुळे नांदेड सह संपूर्ण मराठवाडा विभागातील आरोग्य व वैद्यकीय संशोधन क्षेत्राला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नांदेडमध्ये सिजीएचएस वेलनेस सेंटर ला मंजुरी; सीसीआरएएस अनुसंधान केंद्राचीही खा. डॉ. अजित गोपछडेंनी राज्यसभेत केली मागणी

0Share
Leave a reply












