राहुरी प्रतिनिधी (सोमनाथ वाघ ) : राहुरी तालुक्यातील केसापूर येथे पंतप्रधान आवास घरकुल योजनेत लाभार्थ्याचे नाव मंजूर होऊन तब्बल पाच महिने उलटून गेले, तरीही त्याला पहिला हप्ता मिळालेला नाही. विशेष म्हणजे, हा हप्ता चुकून दुसऱ्याच व्यक्तीच्या खात्यात जमा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लाभार्थी बाळासाहेब तुकाराम शिंदे रा. केसापूर यांना आजतागायत घरकुलाच्या पायाचे बांधकामही सुरू करता आलेले नाही.
लाभार्थ्यांच्या माहितीनुसार, त्यांना मिळणारा पहिला १५ हजार रुपयांचा हप्ता पंचायत समिती राहुरीच्या प्रणालीद्वारे नेवासा तालुक्यातील सलबतपूर येथील एका व्यक्तीच्या बडोदा बँक खात्यात जमा झाला आहे. या संदर्भात श्री. शिंदे यांनी दिनांक २९ एप्रिल २०२५ रोजी बडोदा बँक, सलबतपूर शाखा व्यवस्थापकांना लेखी निवेदन दिले होते. त्यानंतर ९ मे २०२५ रोजी पंचायत समिती राहुरीचे गट विकास अधिकारी यांनाही याबाबत लेखी पत्र सादर करण्यात आले होते. मात्र, अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांना भेटूनही अद्याप पहिला हप्ता शिंदे यांना वर्ग झालेला नाही.
श्री. शिंदे यांची काहीही चूक नसताना, घरकुल हप्ता न मिळाल्याने घरकुलाचे बांधकाम रखडले असून त्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पहिला हप्ता त्यांच्या खात्यात जमा न झाल्यास, लाभार्थी शिंदे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते पंचायत समिती राहुरी कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याची माहिती केसापूरचे माजी सरपंच दिपक पवार यांनी दिली आहे. या प्रकरणी संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालून घरकुल हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची मागणी होत आहे.
घरकुल मंजूर, पण पहिला हप्ता दुसऱ्यांच्या खात्यात जमा, लाभार्थी संतप्त, राहुरीतील धक्कादायक प्रकार समोर ; ३० सप्टेंबरपर्यंत हप्ता न मिळाल्यास उपोषणाचा इशारा

0Share
Leave a reply












