SR 24 NEWS

शिक्षण विषयी

शिक्षकांच्या कार्यमुक्तीचे आदेश मे २०२६ नंतर द्यावेत, क्रांतीसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे :  जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या झालेल्या बदल्या रद्द न करता, कार्यमुक्तीचे आदेश थेट मे २०२६ नंतर द्यावेत, अशी मागणी अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षाचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, अहिल्यानगर जिल्हा परिषद क्षेत्रातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश जुलै २०२५ मध्ये अंमलात आणले गेले. मात्र, शैक्षणिक वर्षाचा मोठा भाग पार होत असताना अचानक झालेल्या या बदल्यांमुळे विद्यार्थ्यांवर मानसिक ताण येतो, अभ्यासक्रमात अडथळे निर्माण होतात आणि शैक्षणिक गुणवत्ता घसरते, असा गंभीर परिणाम होत आहे.

“इ. १ ली ते ४ थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांप्रती भावनिक नाते निर्माण झालेले असते. अशा वेळी शिक्षक बदल्यांमुळे त्या नात्यांमध्ये व्यत्यय येतो, ज्याचा खोल परिणाम त्यांच्या मनोविश्वावर होतो,” असे म्हसे पाटील यांनी स्पष्ट केले. बदल्यांचे आदेश योग्य असले तरीही त्यांची अंमलबजावणी मे २०२६ नंतर केल्यास विद्यार्थी व शिक्षक या दोघांच्याही दृष्टीने हितकारक ठरेल, असे त्यांनी अधोरेखित केले.

या मागणीला अनेक पालकांनीही पाठिंबा दिला असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र अखंडित राहावे व त्यांचा सर्वांगीण विकास साधावा, यासाठी शासनाने सदर प्रस्ताव गांभीर्याने विचारात घ्यावा, अशी अपेक्षा क्रांतीसेना पक्षाने व्यक्त केली आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निवेदनाची सकारात्मक दखल घ्यावी आणि लवकरच यावर निर्णय जाहीर करावा, अशी मागणी अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षाने केली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!