SR 24 NEWS

राजकीय

राहुरीतील ८३ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर : ४३ ठिकाणी महिलाराज

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / आर. आर. जाधव :राहुरी तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण प्रक्रिया बुधवार, दि. २४ जुलै रोजी पार पडली. राहुरी पंचायत समितीच्या डॉ. दादासाहेब तनपुरे सभागृहात ही आरक्षण सोडत श्रीरामपूरचे प्रांताधिकारी किरण सावंत यांच्या अध्यक्षतेखाली तर राहुरीचे तहसिलदार नामदेव पाटील, नायब तहसिलदार संध्या दळवी यांच्या उपस्थितीत पार पडली.

या प्रक्रियेत तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींची सोडत काढण्यात आली. उर्वरित ३ ग्रामपंचायतींचे आरक्षण मागील सोडतीप्रमाणे यथावत ठेवण्यात आले आहे. एकूण ८३ ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित जातीसाठी ११, अनुसूचित जमातीसाठी १५, इतर मागास वर्गासाठी २२ आणि खुल्या प्रवर्गासाठी ३५ ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे, यामधील तब्बल ४३ ग्रामपंचायतींमध्ये महिलांना सरपंच पदाची संधी मिळणार असून, अनेक ठिकाणी महिलाराज येणार आहे. काही इच्छुकांच्या मनासारखे आरक्षण ठरल्यामुळे त्यांची जय्यत तयारी सुरू झाली आहे, तर काहीजणांना अपेक्षाभंगाचा सामना करावा लागला.

काही गावांमध्ये महिला आरक्षण जाहीर झाल्याने स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये हालचाली सुरू झाल्या असून, काहींनी आपापल्या संभाव्य उमेदवारांची तयारी सुरू केली आहे. या आरक्षण प्रक्रियेमुळे गावपातळीवरील राजकारणाला नवसंजीवनी मिळाली आहे.

 


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!