राहुरी प्रतिनिधी : माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाला राहुरी शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गुरुवारी (दि. २४ जुलै) सकाळी ९ वाजता प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नगर-मनमाड महामार्गावरील मार्केट कमिटीसमोर रास्ता रोको करत सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकरी व दिव्यांगांसंबंधी विविध मागण्या सरकारकडे मांडण्यात आल्या. यावेळी प्रहारचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना या आंदोलनादरम्यान शिष्टमंडळाने निवेदन सादर केले.
प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :
1. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून सातबारा उतारा कोरा करावा.
2. पेरणीपासून कापणीपर्यंतचा खर्च मनरेगाच्या माध्यमातून मिळावा.
3. शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा.
4. दिव्यांग नागरिकांना दरमहा ६,००० रुपये पेन्शन मिळावी.
5. दिव्यांगांसाठी घरकुल योजनेचा लाभ द्यावा.
या निवेदनात प्रहारचे संस्थापक बच्चू कडू यांनी मागील सहा महिन्यांपासून शेतकरी व दिव्यांग हक्कांसाठी सुरु केलेल्या लढ्याचा उल्लेख करत, “सरकारने केवळ आश्वासने दिली असून प्रत्यक्षात कोणतीच ठोस कृती झालेली नाही,” असा आरोप करण्यात आला.
या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, प्रहारचे तालुका अध्यक्ष सुरेश लांबे, दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर गाडगे, जिल्हा सल्लागार सलीमभाई शेख, तालुका अध्यक्ष योगेश लबडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलकांनी निवेदन सादर करून शांततेत आंदोलन मागे घेतले.
प्रहार संघटनेच्या चक्काजाम आंदोलनाला राहुरीत उत्स्फूर्त प्रतिसाद; शेतकरी व दिव्यांगांच्या मागण्यांसाठी घोषणाबाजी

0Share
Leave a reply













