SR 24 NEWS

शिक्षण विषयी

जवाहरच्या कला उत्सवात विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने श्रोते मंत्रमुग्ध, कडाक्याच्या थंडीतही खंडोबा मंदिर भरले खचाखच

Spread the love

तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे: विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने अणदूर येथील खंडोबा देवालयात जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी बुधवार दि. २४ डिसेंबर रोजी भव्य कला उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कडाक्याच्या थंडीवर मात करत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलाविष्कारांनी उपस्थित श्रोते अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. कला उत्सवाचे उद्घाटन महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्ष कल्याणी मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळ अणदूरचे सचिव तथा अणदूरचे सरपंच रामचंद्र आलुरे, ग्रामपंचायत सदस्य बालाजी घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीत व गणेश वंदनेने झाली. त्यानंतर देशभक्तीपर गीते, भावगीते, भक्तिगीते, भजने, ऐतिहासिक गीतांवरील नृत्य, विविध पारंपरिक नृत्यप्रकार, पोवाडे तसेच पौराणिक कथांचे सादरीकरण रसिक प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरले. प्रत्येक कलाप्रकाराला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त दाद, टाळ्यांचा कडकडाट व रोख बक्षिसांच्या स्वरूपात भरभरून प्रतिसाद मिळत होता.

सायंकाळी सहा वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम रात्री दहा वाजेपर्यंत रंगतदार वातावरणात सुरू होता. कडाक्याच्या थंडीमुळे कार्यक्रमाची सुरुवात लवकर करण्यात आली असली, तरी सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रोते जागेवरून हलले नाहीत. इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या कला उत्सवात सहभाग घेतला असून, सहभागी कलाकारांमध्ये विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय होती.

जवळपास पाच हजार प्रेक्षक क्षमतेचे खंडोबा मंदिर खचाखच भरले होते. मंदिर परिसरासह झाडांवर, शाळेच्या पत्र्यावर तसेच मंदिराच्या आजूबाजूला जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक बसलेले दिसून आले. महिला, पालक व युवकांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय होती. कार्यक्रमात सादर करण्यात आलेले बंजारा नृत्य, राजस्थानी घूमर नृत्य तसेच ‘छावा’ चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हुबेहूब सादरीकरणाने उपस्थितांच्या अंगावर शहारे उभे राहिले. कडाक्याच्या थंडीतही कार्यक्रम उत्तरोत्तर अधिक रंगतदार होत गेला.

या कला उत्सवाला जवाहर विद्यालयातून १९९३ साली दहावीमध्ये महाराष्ट्रातून प्रथम आलेले माजी विद्यार्थी सचिन हराळकर, मुख्याध्यापक गोपाळ कुलकर्णी, सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त सुरेश कंदले, सत्येश्वर पाटील, अण्णा महाराज, आप्पासाहेब शेटे, सेवानिवृत्त शिक्षक लिंबाजी सुरवसे, अविनाश मोकाशे, चंद्रशेखर कंदले यांच्यासह अनेक कलाप्रेमी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित मोरे यांनी केले, तर सिद्धेश्वर मसुते यांनी आभार प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांचे आकर्षक मेकअप किरण गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सर्व शिक्षकवर्गाने परिश्रम घेतले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!